शाळेच्या कँटीनमधून जंकफूड बाद

मधल्या सुट्टीत शाळेच्या कँटीनमध्ये जाऊन खवय्येगिरी करणाऱ्या मुलांना आता आपल्या जिभेवर थोडे नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कारण राज्य सरकारने 'एचएफएसएस फूड' (हाय इन फॅट, सॉल्ट अँड शुगर) अंतर्गत जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असलेले खाद्यपदार्थ शाळेच्या उपहारगृहात बनवणे किंवा त्यांची विक्री करण्यावर बंदी घातलीय. यासंदर्भातला आदेश सोमवारी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने काढलाय. यामुळे पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रींक इत्यादी जंकफूड शाळेच्या कँटीनमधून बाद होणार आहे.

विद्यार्थांच्या खाण्यामध्ये जास्त मीठ, साखर व मेदयुक्त पदार्थांच्या ऐवजी त्यांच्या शरीरास पोषक ठरणारे अन्नपदार्थ असावेत, असा केंद्र सरकारचा आग्रह होता. असे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना प्राधान्याने मिळावेत, म्हणून शाळांना प्रोत्साहन देण्याकरिता केंद्राने काही दिवसांपूर्वी एका समितीची स्थापना केली होती. या समितीने विद्यार्थ्यांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी, शारीरिक व मानसिक विकास साधण्यासाठी सरकारला काही शिफारशी केल्या आहेत. या अंतर्गत शाळेच्या उपहारगृहांमध्ये कोणते पदार्थ असावेत आणि कोणते पदार्थ असू नयेत याबाबतही समितीने शिफारशी केल्या आहेत.

'एचएफएसएस फूड'मुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणासोबतच इतर आजारांचे प्रमाणही वाढते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होतो. त्यामुळे सरकारने शाळेच्या उपहारगृहात 'एचएफएसएस फूड' बनविण्यास आणि विकण्यास बंदी घालावी, अशीही शिफारस समितीने केली होती. या शिफारसीनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. एवढेच नव्हे, तर या पदार्थांची विक्री शाळेच्या उपगृहात होणार नाही याची खात्री मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाने करायचीय.

या खाद्यपदार्थांवर असेल बंदी :

  • बटाट्याचे तळलेले चिप्स, स्थानिक उत्पादकांनी तयार केलेले चिप्स

  • सरबत, बर्फाचा गोळा

  • शर्करायुक्त कार्बोनेडेट शीतपेय व नॉन कार्बोनेडेट शीतपेय

  • रसगुल्ले, गुलाब जाम, पेढे, कलाकंद, जेली

  • जाम, पेस्ट्री, नूडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्का

  • पाणीपुरी, केक, बिस्कीट, बन्स, गोळ्या आणि कँडी, चॉकलेट्स आणि मिठाई

  • 30 टक्क्यांपेक्षा जास्त शर्करा असणारे पदार्थ जसे. बुंदी, इमरती व इतर

शाळेच्या कँटीनमध्ये हे पदार्थच मिळतील :

  • गव्हाची चपाती, रोटी/ पराठा (ऋतुनुसार भाज्या असाव्यात)

  • एकापेक्षा अधिक धान्याची चपाती, रोटी/ पराठा

  • भात, भाजी, पुलाव, काळे चणे, काबुली चणे, राजमा, डाळी

  • कढीभात

  • इडली, सांबर, वडे

पुढील बातमी
इतर बातम्या