अर्धे वर्ष उलटलं तरी अायडॉलचे विद्यार्थी पुस्तकाविना

गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबई विद्यापीठामार्फत दूर व मुक्त शिक्षण देणाऱ्या आयडॉलच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातच अर्धे वर्ष उलटून गेलं तरी आयडॉलच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तकंच मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

दरवर्षी ८० हजार विद्यार्थी

काही कारणांनी ज्या विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेता येत नाही, किंवा काहींना नोकरी करताना शिक्षण घेता यावं यासाठी मुंबई विद्यापीठानं दूर व मुक्त शिक्षण संस्था म्हणजेच आयडॉलची स्थापना केली. या संस्थेत दरवर्षी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी जवऴपास ८० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यानुसार या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांनुसार पुस्तक देण्यात येतात. 

एम कॉम विद्यार्थी पुस्तकाविना

परंतु २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील मास्टर इन कॉमर्स (एम कॉम) या अभ्यासक्रमातील दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तकंच मिळाली नसल्याचं समोर आलं आहे.  एम कॉमच्या दुसऱ्या वर्षाला रिसर्च मेथोडलॉजी, अॅडव्हान्स फायनाशियल मॅनेजमेंट, अॅडव्हान्स ऑडिटींग, डायरेक्ट अँड इन डायरेक्ट टॅक्सेस, ऑर्गनायझेशनल बिहेव्हियर, इंटरनॅशनल मार्केटिंग, इंटरप्रेन्युशिप मॅनेजमेंट हे विषय असतात. 

अभ्यास कसा करायचा?

यातील रिसर्च मेथडलॉजी, अॅडव्हान्स फायनाशियल मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशनल बिहेव्हियर, इंटरप्रेन्युशिप मॅनेजमेंट या विषयांची पुस्तकं प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. मात्र अॅडव्हान्स ऑडिटींग, डायरेक्ट अँड इन डायरेक्ट टॅक्सेस, इंटरनॅशनल मार्केटिंग या विषयांची पुस्तक अद्याप विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे येत्या एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा असून एम कॉम प्रवेश घेतलेले हजारो विद्यार्थी पुस्तक नसल्यानं अभ्यास कसा करायचा या गोंधळात पडले आहेत. दरम्यान याबाबत विद्यार्थ्यांनी अनेकदा आयडॉलमध्ये विचारणा केली असून त्यांना लवकरच पुस्तकं येतील असं उत्तर कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे. 

आयडॉलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेबसाईटवर पुस्तकं उपलब्ध आहेत की नाहीत याबाबत स्टेट्स टाकण्यात येतं. अनेकदा ही पुस्तकं उपलब्ध नसल्यास त्यासमोर उपलब्ध नाही असं टाकण्यात येतं. त्यामुळ विद्यापीठाच्या वेबसाईटवर या पुस्तकांबाबत तपासणी करावी.  

-विनोद मळाले, जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ 


पुढील बातमी
इतर बातम्या