खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये- अमित देशमुख

कोविड – १९ या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केलं. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करु नये, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयाच्या संघटनेला केलं. (maharashtra cabinet minister slams private medical colleges for fee hike)

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, एसएनबीटी एज्युकेशनल ट्रस्टचे डॉ. हर्षल तांबे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांवर फी वाढीचा बोजा लादणं योग्य होणार नाही आणि त्यामुळेच या शैक्षणिक वर्षात कोणतीही अतिरिक्त फी वाढ करण्यात येऊ नये यासाठी आपण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी देखील प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत.

राज्यातील बऱ्याच प्राथमिक आणि उच्च शिक्षण शैक्षणिक संस्थांनी कोविडच्या काळातही विद्यार्थ्यांकडून सक्तीने शुल्क वसुली केली होती. यामुळे बहुतांश पालक आणि विद्यार्थ्यांवर आर्थिक स्थितीत कमकुवत असतानाही शुल्क भरण्यासाठी दबाव आला. यामुळे सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. तर काही ठिकाणी शैक्षणिक संस्था सरकारच्या आदेशाला न जुमानता शुल्कवाढ करत असल्याने पालक आणि विद्यार्थी जेरीस आले आहेत. अशा शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्याचीही मागणी केली जात आहे.


हेही वाचा -

‘या’ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात ५ टक्के जागांवर प्रवेश राखीव


पुढील बातमी
इतर बातम्या