स्कूल बसच्या भाडे शुल्कात होणार ३० टक्क्यांनी वाढ; १० फेब्रुवारीपासून होणार सेवा सुरू

मुंबईसह राज्यभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळुहळू कमी होऊ लागला आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानं राज्यातील निर्बंध शिथिल केले जात आहेत. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्यत आल्या. त्यानंतर आता शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी सोयीचं असणाऱ्या स्कूल बस सेवाही सुरू केली जात आहे. येत्या १० फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू केली जाणार आहे. मात्र, मुलांना स्कूल बसनं शाळेत पाठवायचे असल्यास ३० टक्के अधिकचा शुल्क मोजावा लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ वर्ष स्कूल बस सेवा ही बंद होती. मात्र आता ही स्कूल बस पुन्हा रस्त्यावर धावणार आहे. परंतू, डिझेल दरवाढ, कर्मचाऱ्यांचे वाढते पगार आणि ५० टक्के आसन क्षमतेने स्कूल बस सुरू होत असताना आता स्कूल बसची ३० टक्के भाडेवाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल बस सुद्धा १० फेब्रुवारी पासून पूर्णपणे सुरू होत आहेत. मात्र, स्कूल बसच्या आधीच्या शुल्कामध्ये ३० टक्के शुल्क वाढ करण्याचा स्कूल बस मालक संघटनेने ठरवले आहे.

राज्य सरकारने स्कूल बसचा २ वर्षचा रोड टॅक्स जरी माफ केला असला तरी वाढती महागाई, डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात नियमानुसार ५० टक्के आसन क्षमतेने स्कूल बस सुरू होत असल्यानं ३० टक्के भाडे वाढ करणार असल्याचे स्कूल बस मालक संघटनेनं स्पष्ट केलं. त्यामुळे मुलांना स्कूल बसनं शाळेत पाठवायचे असल्यास ३० टक्के अधिकचा शुल्क मोजावा लागणार आहे.

राज्यात साधारणपणे ४४ हजार स्कूल बस महाराष्ट्रात तर मुंबईत सुद्धा ८५००च्या जवळपास स्कूल बस आहेत. मागील दोन वर्षापासून या स्कूल बस अनेक ठिकाणी बंद आहेत. स्कूल बस पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्यानंतर सुरू होत असताना मेंटेनन्स खर्च कर्मचाऱ्यांचे वाढते पगार हे सगळं विचारात घेता स्कूल बसने शुल्क वाढ करायचे ठरवले आहे.

शाळा सुरू झाल्या तरी अद्यापही त्या संख्येने विद्यार्थी शाळेत येत नाहीत. त्यामुळे अजूनही त्या प्रमाणात स्कूल बस सुरू करता येत नाहीत. स्कूल बस मध्ये १२ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४० सीट बस मध्ये ४० ते ६० विद्यार्थ्यांना घेऊन परवानगी होती. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार आसन क्षमतेच्या ५० टक्के म्हणजे फक्त २० विद्यार्थी स्कूल बस मधून प्रवास करतील.

त्यामुळे स्कूल बस मालकांना हे परवडणारे नाही. जरी सध्या ज्या प्रकारे बस, रेल्वेमध्ये शंभर टक्के आसन क्षमतेने प्रवासी प्रवास करत आहेत. त्याप्रमाणे स्कूल बस मध्ये सुद्धा १०० टक्के क्षमतेने मुलांना ने-आण करण्यास परवानगी मिळाली तरीसुद्धा शुल्कवाढ ही करावीच लागणार असल्याचा स्कुल बस मालक संघटनेने सांगितला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या