एमबीबीएस अभ्यासक्रमात बदल होण्याची शक्यता, डॉक्टर गिरवणार नैतिकतेचे धडे

डॉक्टरी पेशासाठीची आवश्यक ती माहिती, मानसिकता, कर्तव्ये आण‌ि बंधने विद्यार्थ्यांमध्ये बिंबवावीत, यासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल करण्याचं मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियानं सुचविलं आहे. लवकरच हे बदल केंद्र सरकारसमोर सादर केले जाणार आहेत. त्यांच्या मान्यतेनंतर म्हणजेच पुढच्या वर्षी हे बदल लागू करण्यात येतील, अशी माहिती राज्य वैद्यकीय संचलनालयाकडून मिळाली आहे.

याबाबत नुकतीच दिल्लीत बैठक पार पडली. अभ्यासक्रमासोबतच डॉक्टरांना मानसिक ताण, संवेदनशीलता, परस्पर संबंध, नैतिकता आणि व्यावसायिकता, यांचं शिक्षणही मिळावं यासाठी यांचा अंतर्भाव विषयांमध्ये असेल, असा अभ्यासक्रम नियोजित करण्याबाबत 'मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया'नं सुचवलं आहे. अनेक शाळा, वैज्ञानिक आणि शिक्षण तज्ज्ञांकडून माहिती घेत चर्चा करून हे बदल सुचवण्यात आले आहेत.

डॉक्टर आणि रुग्णांमधील संवाद सुधारणार

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवाद कौशल्य हा अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. डॉक्टरांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी कसं वागावं? हे यामधून शिकवलं जाईल. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांमधील संवाद सुधारण्यास मदत होणार आहे. यासोबतच स्त्री-पुरुष समानतेचाही अंतर्भाव यात असेल.

कायद्याचे प्रशिक्षण

दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या डॉक्टरांना कायद्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. आज मेडिकलमध्ये कट प्रॅक्टिस, गर्भपात कायदा, ग्राहक संरक्षण (कंन्झ्युमर प्रोटेक्शन) कायदा असे अनेक कायदे आहेत. याची माहिती त्यांना असावी आणि त्याचं पालन त्यांनी करावं. सोबतच त्यामुळे ते अडचणीत येऊ नयेत, यासाठी या कायद्याची संपूर्ण माहिती त्यांना असावी म्हणून या कायद्यांचा समावेश नवीन प्रस्तावित अभ्यासक्रमात असणार आहे.

डॉक्टरांना नैतिकतेचे धडे

डॉक्टरांची नैतिक जबाबदारी काय? रुग्णांचे हक्क कोणते? यासाठी नवीन अभ्यासक्रमात बायोएथिक्‍स आणि मेडिकल एथिक्‍स विद्यार्थ्यांना शिकवले जातील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे, आगामी काळात आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच नैतिकतेचं (एथिक्‍स) शिक्षण देण्यास मदत होणार आहे. याचसोबत यामुळे वैद्यकीय क्षेत्रामधील नफेखोरीलाही आळा बसू शकणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या