राज्य सेवा पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवारी १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती. ही परीक्षा आता पुन्हा पुढे ढकलली आहे. राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.

ही परीक्षा दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

याबाबतचं प्रसिद्धीपत्रक राज्य लोकसेवा आयोगाच्या सहसचिवांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. प्रसिद्धीपत्रक म्हटलं आहे की,  आयोगाला राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून १० मार्च रोजी यासंदर्भातले निर्देश पत्राद्वारे कळवण्यात आले. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी अनेक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.  परीक्षा कधी होणार याबाबत लवकरच तारीख जारी केली जाईल, असंही यामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर एमपीएससी ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.

पुढील बातमी
इतर बातम्या