अतिवृष्टीचा इशारा, मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा रद्द

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) परीक्षांना आजपासून सुरुवात होणार होती. परंतु, अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं विद्यापीठाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

आज मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून आज मुंबईत (Mumbai Rain Update) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनंही नागरिकांना प्रशासनाकडून केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठानं आज, गुरुवार 14 जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येतील, असंही विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.

आज मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा होणार होत्या. त्याचबरोबर आज होणाऱ्या इतर परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

ठाण्यामधील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळांना 14 आणि 15 जुलै रोजी दोन दिवसांची सुटी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जाहीर केली आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या