विद्यार्थ्यांनो टेन्शन नाॅट! परीक्षा शुल्कात ६० ते ८० टक्के कपात

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेत परीक्षा शुल्कात मोठी कपात केली आहे. ११ डिसेंबर २०१७ ला झालेल्या विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेमध्ये परीक्षा शुल्क कमी करण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या प्रथम सत्र (उन्हाळी परीक्षा) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

कधी केली होती वाढ?

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून परीक्षा शुल्कात वाढ केली होती, मात्र या वाढीव परीक्षा शुल्काबाबत फेरविचार व्हावा यासाठी अधिष्ठाता मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार, २५ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर तपशीलवार चर्चा करण्यात आली आणि परीक्षा शुल्कात कपात करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्यात आला.

किती टक्के कपात?

या ठरावाच्या अनुषंगाने सर्वसाधारणपणे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेच्या शुल्कात १० टक्के एवढी कपात करण्यात आली आहे. पदवी परीक्षेसाठी विषयनिहाय एका विषयासाठी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याला आधी १००० रुपये शुल्क अदा करावे लागत होते, तेथे त्याला आता फक्त २०० रुपये (८० टक्के कपात) शुल्क अदा करावे लागतील. तर पदव्युत्तर परीक्षेला एका विषयासाठी बसणाऱ्या विद्यार्थ्याला आधी १५०० रुपये शुल्क अदा करावे लागत होते, त्यासाठी आता फक्त ४०० रुपये ( ७३ टक्के कपात) शुल्क अदा करावे लागतील.

२ विषयांसाठी किती?

त्याचप्रमाणे पदवीसाठी २ विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याला आधी १००० रुपये शुल्क द्यावे लागत होते, त्याला आता ४०० रुपये (६० टक्के कपात) शुल्क भरावे लागणार आहेत. तर पदव्युत्तर परीक्षेसाठी २ विषयासाठी आधी १५०० रुपये शुल्क भरावे लागत होते, तिथं विद्यार्थ्याला आता ७०० रुपये (५३ टक्के कपात) शुल्क भरावे लागतील.

३ किंवा अधिक विषयांसाठी किती?

तीन किंवा अधिक विषयांसाठी आणि नवीन विद्यार्थी पदवीच्या परीक्षेला बसणार असतील त्या शुल्कामध्ये १० टक्के कपात करण्यात आली असून आता पदवीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याला ९०० रुपये शुल्क अदा करावे लागणार आहेत. तर पदव्युत्तर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याला १५०० रुपये ऐवजी १३५० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.

कधीपासून लागू?

परीक्षा शुल्कातील ही कपात प्रथम सत्र (उन्हाळी) परीक्षा २०१८ पासून लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रथम सत्र (उन्हाळी) परीक्षा २०१९ पासून परीक्षा शुल्कात दरवर्षी ५ टक्के दराने शुल्क वाढ करण्यात यावी असंही विद्वत आणि व्यवस्थापन परीषदेनं ठरविलं आहे.

महाविद्यालयांनी वेळोवेळी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने मानधनामध्ये वाढ करण्यासाठी विद्यापीठाने समिती नेमली होती. त्यानुसार समितीच्या शिफारशीनुसार परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली. मात्र विविध घटकांकडून परीक्षा शुल्कात सवलत मिळावी यासाठी विद्यापीठाकडे निवेदने प्राप्त झाली होती. त्यानुसार अधिष्ठाता मंडळाच्या शिफारशीनुसार या परीक्षा शुल्कात कपात सुचविण्यात आली होती.

- लीलाधर बन्सोड, उपकुलसचिव (जनसंपर्क)

पुढील बातमी
इतर बातम्या