मुंबई विद्यापीठातील पदवी सत्र-६च्या परीक्षा गुरूवारपासून

मुंबई विद्यापीठाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांतील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवी, अंतिम वर्ष सत्र-६च्या परीक्षा ६ मेपासून सुरू होणार आहेत. बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएमएस, बीएमएम, बीकॉम अकाऊंट्स अ‍ॅण्ड फायनान्स, बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अशा एकूण ४५ विद्याशाखांच्या अंतिम वर्ष सत्र-६च्या परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहेत.

ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येणारी ही परीक्षा २१ मेपर्यंत सुरू राहणार आहे. ४५०हून अधिक महाविद्यालयातील दीड लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठानं घेतला असून, ६ ते २१ मे या कालावधीत आपल्याल्या वेळापत्रकानुसार महाविद्यालयांनी परीक्षेचं नियोजन केलं आहे.

वाणिज्य पदवी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा सर्वाधिक आहे. वाणिज्य शाखेतून ६८ हजार १०१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बीएमएसमध्ये १६ हजार ५०१, कला शाखेमध्ये १४ हजार ५९२, विज्ञान शाखेत १० हजार ७७० आणि उर्वरित शाखांचे मिळून जवळपास १ लाख ५५ हजार १५५ परीक्षार्थी आहेत.

परीक्षेच्या आयोजनासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांचे समूह तयार केले असून प्रत्येक क्लस्टरमधील एका महाविद्यालयास प्रमुख महाविद्यालय म्हणून जबाबदारी दिलेली आहे. त्यासाठी महत्त्वाच्या ९४ महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या