मुंबई विद्यापीठाच्या 2026 परीक्षांसाठी APAAR ID अनिवार्य

मुंबई विद्यापीठाने 2026 च्या परीक्षांसाठी APAAR ID अनिवार्य केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप APAAR ID तयार केलेला नाही, त्यांना परीक्षेचे हॉलतिकीट दिले जाणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. हा नियम मुंबई विद्यापीठासह त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा जवळ येण्यापूर्वी APAAR IDची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

APAAR ID नोंदणी प्रक्रियेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडून विशेष Aadhaar Suvidha Camp आयोजित करण्यात आला आहे. हा कॅम्प 19 आणि 20 ऑगस्ट 2026 रोजी कालिना कॅम्पसमध्ये आयोजित केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या कॅम्पला भेट देता येणार आहे. आधार कार्ड आणि शैक्षणिक नोंदींशी संबंधित अडचणी असल्यास त्या सोडवण्यासाठी कॅम्पमध्ये मदत केली जाणार आहे.

APAAR ID म्हणजे काय?

APAAR म्हणजे Automated Permanent Academic Account Registry. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात NEP 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ही डिजिटल शैक्षणिक ओळख निर्माण करण्यात आली आहे.

विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासातील विविध माहिती एका डिजिटल प्रोफाइलशी जोडण्याची या प्रणालीची संकल्पना आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता, गुण, क्रेडिट्स आणि इतर शैक्षणिक नोंदी डिजिटल स्वरूपात जोडल्या जाऊ शकतात.

APAAR ID ही Academic Bank of Credits (ABC) प्रणालीशीही जोडलेली आहे. ABCच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडिट्स डिजिटल पद्धतीने साठवता येतात आणि आवश्यकतेनुसार विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ते हस्तांतरित करण्याची सुविधा मिळू शकते.

महाविद्यालयांनाही सूचना

APAAR IDची प्रक्रिया अद्याप पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांना याबाबत माहिती देण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रक्रिया प्रलंबित ठेवू नये आणि लवकरात लवकर APAAR ID तयार करून घ्यावा, असे विद्यापीठाने सांगितले आहे.

दरम्यान, APAAR आणि ABCशी संबंधित माहिती महाविद्यालयांकडून वेळेत सादर न झाल्यामुळे यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम झाला होता. मे महिन्यात तृतीय वर्ष बीकॉमच्या 8,500 हून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल रखडले होते, कारण संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक ABC आणि APAARची माहिती सादर केली नव्हती.

त्यामुळे आता मुंबई विद्यापीठाने 2026च्या परीक्षांसाठी APAAR ID अनिवार्य केल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा

BEST कर्मचाऱ्यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

पुढील बातमी
इतर बातम्या