एम.ए, एम.कॉमच्या विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा महिनाभर पुढे ढकलल्या!

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांचा फटका विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षांना बसल्याने अभ्यासक्रमच पूर्ण झाला नाही. यामुळे एमएससी प्रमाणेच आता एमकॉम आणि एमएची परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की मुंबई विद्यापीठावर त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे ओढावली आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा

विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या मागणीनंतर एम.ए आणि एम.कॉमच्या प्रथम सत्र परीक्षा पुढे ढकलणाच्या प्रस्तावास मुंबई विघापीठाकडून मान्यता मिळाली आहे. विद्यापीठ प्रशासनानं नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. ही मागणी मान्य झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे एमएची परीक्षा २३ जानेवारीपासून तर एमकॉमची परीक्षा २९ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

विद्यापीठ प्रशासनात ताळमेळ नाही

ऑनलाईन मूल्यांकनामुळे रखडलेले निकाल आणि उशिरा सुरू झालेली पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया यामुळे या अभ्यासक्रमाचे जेमतेम ५० दिवस पूर्ण झाले आहेत. अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यानं विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठाने एमएससीच्या परीक्षा जवळपास महिनाभरानं पुढे ढकलल्या. मात्र एमकॉम आणि एमएच्या वेळापत्रकात बदल केला गेला नाही. नियमानुसार परीक्षा होण्याआधी अभ्यासक्रमाचे वर्ग किमान ९० दिवस भरणे बंधकारक आहे. हा नियम जसा विज्ञान शाखेला लागू होतो तसाच तो इतर शाखांनाही लागू आहे. विज्ञान शाखेप्रमाणेच कला आणि वाणिज्य शाखेचे प्रवेशही नोव्हेंबरपर्यंत सुरू होतं. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकातही बदल करावा, असं निवेदन विद्यार्थी संघटनांना करावं लागलं.

पदव्युत्तर परीक्षांबाबतचा हा घोळ विद्यापीठाच्या लक्षात येणे गरजेचे होते. मात्र दरवेळेस चूक दाखवून दिल्यानंतर सुधारणा करण्याची सवय विद्यापीठाला झाली आहे. विभागाचे प्रमुख, परीक्षा विभाग यांमध्ये ताळमेळ नाही. चूक लक्षात आल्यानंतर तरी ती सर्वांगीण विचार करून सुधारण्याची वृत्ती परीक्षा भवनातल्या अधिकाऱ्यांची नाही, हेच यावरून स्पष्ट होत आहे.

- सुधाकर तांबोळी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

पुढील बातमी
इतर बातम्या