MPSC Exams: MPSC च्या विद्यार्थ्यांना दिलासा, एका वर्षाची मुदत वाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC च्या परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्यानं अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांची ही मागणी होती, त्यानुसार सरकारनं निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्ता भरणे म्हणाले, दोन वर्ष कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी अशी मागणी होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. एक वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे १८ ते २० लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या चार ते पाच हजार असते. मात्र वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग कधीच करत नाही.

आधी राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट राहिल्यानंतर आणि कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झालेल्याच नाहीत.


पुढील बातमी
इतर बातम्या