महापालिकेकडून सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याच निर्णय

सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या शाळा महापालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे. या शाळांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. या प्रवेशप्रक्रियेची कार्यवाही आॅनलाइन होणार असून, लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. तसंच, गुगल फॉर्म पालकांकडून भरून घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणाऱ्या पालिका शिक्षण विभागाच्या आयसीएसई व सीबीएसई मंडळाच्या शाळांतील प्रवेशप्रक्रिया या लॉकडाऊन काळातही आॅनलाइन पद्धतीनं मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या प्रायोगिक तत्त्वावरील पूनमनगर येथील सीबीएसई आणि वूलन मिल येथील आयसीएसई शाळा अनुक्रमे एप्रिल २०२० आणि जून २०२० पासून सुरू होणार होत्या. त्यासाठीची प्रवेश अर्जप्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरूही झाली.

२६ मार्च ते २८ मार्चच्या दरम्यान प्रवेशप्रक्रियेसाठी सोडतीचं नियोजन करण्यात येणार होतं. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनातर्फे ही प्रवेशप्रक्रिया तात्पुरती पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्ट केलं. या प्रवेशप्रक्रियेची पुढील छाननी प्रक्रिया २७ एप्रिल २०२०पर्यंत पूर्ण करून पात्र-अपात्र विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

३० एप्रिल रोजी मोठ्या स्क्रीनवर आॅनलाइन पद्धतीने पात्र-अपात्र विद्यार्थ्यांच्या याद्या जाहीर करून लॉटरी पद्धतीने निवडप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ज्या वर्गासाठी / इयत्तेसाठी ३८हून अधिक अर्ज आले असतील त्याच इयत्तांसाठी ही निवडप्रक्रिया लॉटरी पद्धती राबविली जाणार आहे. १० मेपर्यंत पालकांना गुगल फॉर्म भरून आपल्या प्रवेशाची निश्चिती करायची आहे. याच कालावधीत ज्या इयत्तांसाठी लॉटरी पद्धत राबविण्यात आली नाही त्या पालकांकडूनही गुगल फॉर्म भरून प्रवेश निश्चिती करून घेतली जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या