कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रमाला सुरूवात करण्यात आली. परंतू, २०२० हे वर्ष संपत आलं तरी अद्याप ११वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबतची संदिग्धता कायम आहे. त्यामुळं आता प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचं शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे.
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती देतानाच यंदा प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू करण्यात येऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले. त्यावेळी ११वी प्रवेशाची पहिली फेरी झाली होती. मात्र, दुसऱ्या फेरीपूर्वी विभागानं प्रवेश प्रक्रिया थांबवली. प्रक्रिया कधी सुरू होणार, पहिल्या फेरीत मिळालेले प्रवेश कायम राहणार का, असं प्रश्न उपस्थित झाले.
प्रवेश प्रक्रिया स्थगित होऊन जवळपास महिना झाला तरीही अद्याप प्रवेश प्रक्रियेबाबतचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. याबाबत कधी निर्णय होणार हे देखील अद्याप अनिश्चित आहे. त्यामुळं सद्य:स्थितीत ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचं शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे.
विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमधील सर्वाधिक घेण्यात येणारे विषय किंवा बंधनकारक असलेल्या विषयांच्या तासिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक या तासिका घेणार आहेत. विद्यार्थ्यांचा कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश झाला नसेल तरीही पसंतीच्या शाखेत विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू करता येणार आहे. विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक शाखांचा अभ्यास करता येऊ शकणार आहे. तसंच, जेणेकरून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, त्यावेळी कोणते विषय आवडतात यानुसार विद्यार्थ्यांना निर्णय घेणेही सोपं होणार आहे.