मुंबईतील ऑरचिड शाळेच्या (Orchid International School) चुनाभट्टी, सायन येथील कॅम्पसबाबत शिक्षण विभागाची अंतिम मंजुरी अद्याप प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाखेत हलवावे लागू शकते, अशी माहिती शाळेकडून पालकांना देण्यात आली आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असताना आलेल्या या घडामोडीमुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, घराजवळ असल्यामुळेच त्यांनी मुलांचे प्रवेश या कॅम्पसमध्ये घेतले होते. मात्र शाळेची इमारत अनधिकृत असल्याची माहिती प्रवेश प्रक्रियेदरम्यान देण्यात आली नव्हती. आता अचानक विद्यार्थ्यांना इतर शाखांमध्ये हलवले जाऊ शकते, असे सांगण्यात आल्याने प्रवास, शिक्षण आणि आर्थिक बाबींविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत.
2026-27 शैक्षणिक वर्षासाठी शाळेने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून शुल्कही स्वीकारले होते. मात्र या आठवड्यात पालकांना अधिकृत संदेश पाठवून गरज पडल्यास विद्यार्थ्यांना इतर ऑर्किड कॅम्पसमध्ये हलवले जाईल, असे सांगण्यात आले. पालकांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 90 टक्के पालकांनी आधीच शुल्क भरले आहे.
काही पालकांनी मंजुरी प्रलंबित असल्याची माहिती प्रवेशपूर्वी का देण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच स्थलांतरामुळे होणारा आर्थिक, मानसिक आणि दैनंदिन प्रवासाचा ताण लक्षात घेऊन प्रवेश रद्द केल्यास शुल्क परताव्याची स्पष्ट व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
शिक्षण विभागाचे उपसंचालक राजेश कनकल (Rajesh Kankal) यांनी सांगितले की, शाळेकडे आवश्यक Occupation Certificate (OC) नसल्यामुळे मंजुरी प्रलंबित आहे. शाळेने अलीकडेच आवश्यक कागदपत्रे सादर केली असून प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तर विभागाचे शिक्षण अधिकारी Mustaq Shaikh यांनी मार्चमध्ये अनधिकृत शाळांबाबत पत्र जारी केले होते. शिक्षणाचा हक्क कायदा 2009 अंतर्गत अनधिकृत शाळांवर 1 लाख दंड आणि नोटीस मिळाल्यानंतरही शाळा सुरू ठेवल्यास दररोज 10 हजार अतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो, असे त्यात नमूद करण्यात आले होते.
तसेच आवश्यक मंजुरी मिळेपर्यंत नवीन प्रवेश घेऊ नयेत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना मान्यताप्राप्त जवळच्या शाळांमध्ये हलवण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मंजुरीशिवाय शाळा सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाई आणि पोलिस तक्रारींचाही इशारा प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा