कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात प्रिती चोरगे प्रथम

घरची परिस्थिती हालाखीची असूनही खचून न जाता प्रतिक्षा नगरमधील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील प्रिती बाळू चोरगे हिने दहावीच्या परीक्षेत 92.94 टक्के मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला.

चुनाभट्टीतील महात्मा फुले नगरमध्ये राहणाऱ्या प्रितीचे वडील ड्रायव्हर असून आई लहानमोठी कामे करून घर चालवते. एका बाजूला आर्थिक अडचणींशी झुंज सुरू असताना प्रितीने अभ्यासावरील लक्ष ढळू दिले नाही. अखंड मेहनत आणि चिकाटीने केलेल्या अभ्यासाच्या जोरावर प्रितीने हे यश मिळवले.

क्लास शिक्षक ज्ञानदेव व्यवहारे यांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाच्या आधारे हे यश मिळवल्याचे प्रितीने नमूद केले. प्रितीच्या यशाने तिचे शिक्षक आणि आई-वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

वर्षभर खूप मेहनतीने अभ्यास केल्याचे फळ मला मिळाले आहे. या यशात माझे आई-वडील आणि शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. मला कला शाखेत प्रवेश घेऊन अभिनय व नृत्य क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे.

- प्रिती चोरगे

पुढील बातमी
इतर बातम्या