शिक्षण विभागाबाबत माहिती नसल्यास वर्षा गायकवाडांनी राजीनामा द्यावा - संजयराव तायडे पाटील

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं सर्व उद्यागधंदे, व्यवसाय बंद पडले. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू झाले. याच काळात शाळेच्या फीच्या मुद्द्यावरून अनेक शिक्षक व पालकांमध्ये वाद झाले. परिणामी, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील खासगी शाळांच्या फीच्या रचनेत बदल करण्याचे निर्देश दिले. परंतू, राज्यातील खासगी शाळांच्या फी च्या रचनेत कोणताही बदल करू नये, अन्यथा शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीवर परिणाम होईल, असं महाराष्ट्र इंग्लिश स्कूल टीचर्स असोशिएशनचे (मेस्टा) अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी म्हटलं.

खासगी शाळांच्या फीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र इंग्लिश स्कूल टीचर्स असोशिएशनचे (मेस्टा) अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी खासगी शाळांच्या फी च्या रचनेत बदल केल्यास ६ लाख शिक्षक आणि दीड लाख शिक्षकेतर सहाय्यक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट येईल, अशी माहिती दिली. शिवाय, त्यांनी या पत्रकार परिषद शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

'महाविकास आघाडी सरकारकडून आमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या धुळीला मिळाल्या आहेत. न मागताच सरकार काहीतरी आम्हाला देईल. काहीतरी बदल झाल्यास चांगलं घडेल अशी अपेक्षा होती. पंरतू, हे त्रिकूट सरकार असल्यानं तीन तिघाडा काम बिघाडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारनं मंत्रीपद वाटताना शिक्षण मंत्रीपद हे वर्षा गायकवाड व बच्चू कडू यांना देऊन फार मोठी चुक केली आहे. ज्यांना शिक्षण विभागाचा कामकाज कसं चालतं याची माहिती नाही त्यांना शिक्षणमंत्री पद कशाला पाहिजे' - संजयराव तायडे पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल टीचर्स असोशिएशनचे (मेस्टा).

मेस्टा संघटनेच्या प्रमुख मागण्या

  • किमान वेतन देणे.
  • मागील ४ वर्षांपासून प्रलंबित आरटीई थकबाकी जारी करणे.
  • २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय कर व वीज शुल्क माफ करणे.
  • राज्य सरकारद्वारे तयार केलेल्या कोणत्याही नियामक समितीमध्ये मेस्टा सदस्यांना पुरेसे प्रतिनिधित्व देणे.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन

मेस्टा संघटनेनं आपल्या प्रमुख मागण्यांसाठी गुरूवार ४ मार्चपासून आंदोलनाला सुरूवात केली असून सलग २ महिने हे आंदोलन चालणार आहे. या आंदोलनाचा शेवटच्या टप्प्यात २ लाख शिक्षक मुंबईत धडकणार असल्याचं संजयराव तायडे पाटील यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचं वाटप नाही

गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, त्यावेळी ठाकरे सरकारनं जीआर काढत ज्या शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येतात त्या शाळांना स्थानिक स्वराज्य संस्थेनं मास्क व सॅनिटायझर पुरवणं बंधनकारक करण्यात आलं होतं. परंतू, त्या शाळांना अद्याप  मास्क व सॅनिटायझर पुरविण्यात आलेलं नाही, मग हा पैसा गेला कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिक्षक 'कोविड वॉरियर्स' नाहीत

शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यापलिकडं जाऊन कार्य केलं. त्यामुळं त्यांचा 'कोविड वॉरियर्स' म्हणून सत्कार करायला हवा होता. परंतू, तोही करण्यात आलेला नाही. याऊलट, फी न भरल्यामुळं त्यांचं मोठ्या प्रमाणात वेतन कपात करण्यात आल्याचंही संजयराव तायडे पाटील यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या