RTE नुसार पालिका, खासगी शाळांतील ऑनलाईन प्रवेश सुरू

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी ‘शिक्षण हक्क  अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत महानगरपालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 पासून सुरुवात झाली आहे.

‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे. तत्पूर्वी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

'आरटीई अंतर्गत दुसऱ्यांदा प्रवेश घेता येणार नाही'                  

ज्या बालकांनी यापूर्वीच आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login या संकेतस्थळास भेट द्यावी.

आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता  विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत 25 टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार, मुंबईतील 1383 पात्र शाळांमधील आरटीईच्या 25 टक्के मोफत प्रवेशासाठी 29 हजार14 जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांना महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal (www नाही)  या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील.  

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन 16 एप्रिल पासून पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी दिली आहे.

आरटीई अंतर्गत मुंबईतील एस.एस.सी. बोर्डाच्या 1399 तर अन्य 64 अशा मिळून 1383 पात्र शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेशासाठी 29 हजार 14 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये एस.एस.सी. बोर्ड 27 हजार 869 तर अन्य 1145 जागांचा समावेश आहे. यापूर्वी ही प्रक्रिया फक्त विनाअनुदानीत खासगी शाळांसाठी लागू असायची.

मात्र, या वर्षीपासून या प्रक्रियेमध्ये सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या शाळा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा तब्बल 1 हजार शाळांची वाढ झाली आहे. तर जवळपास 20 हजार जागादेखील वाढल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता घरापासून 1 किलोमीटरच्या आत असणाऱ्या शाळेमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.      


हेही वाचा

शिक्षकांसाठी ड्रेस कोड जारी, जीन्स आणि टी-शर्टवर बंदी

JNUमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्राच्या बांधकामासाठी 10 कोटी रुपये मंजूर

पुढील बातमी
इतर बातम्या