'ओखी'ची भिती: मुंबईसह पालघर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्गमधील शाळा बंद, काॅलेज सुरू

ओखी वादळाच्या भीतीमुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टी लगतच्या रहिवाशांना सतर्क राहण्याची सूचना हवामान खात्याने केलेली असतानाच शिक्षण विभागानेही खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे पालघर, सिंधुदुर्ग, रायगडमधील किनाऱ्यालगतच्या शाळांना मंगळवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या काळात सर्व काॅलेज सुरू राहतील, असं मुंबई विद्यापीठाने स्पष्ट केलं अाहे.

हवामान खात्याने मंगळवार आणि बुधवारी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

निर्णय कशामुळे?

दक्षिण भारतात हाहाकार माजवलेल्या ओखी चक्रीवादळाने दिशा बदलून गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण सुरु केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या वादळामुळे वाहतूक व अत्यावश्यक सेवाही बाधित होऊ शकतात.

यावेळी वाऱ्याची गती वाढून वारे ६० ते ७० किमी/ प्रतितास वेगाने वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्शवभूमीवर सुरक्षाविषयक उपाय आणि सावधगिरी म्हणून शिक्षण विभागाकडून मुंबई, ठाणे पालघर, सिंधुदुर्ग, रायगड येथील शाळांना  सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

काॅलेज सुरू, परीक्षा होणार

मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. दिनेश कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व काॅलेज मंगळवारी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

तर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा नियोजीत वेळेनुसार होतील, असं परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक अर्जुन घाटुळे यांनी स्पष्ट केलं. 

पुढील बातमी
इतर बातम्या