दादरमधली 'शारदाश्रम' आता इतिहासजमा होणार!

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • शिक्षण

दादरमधील शारदाश्रम शाळा ही सर्वांनाच परिचित आहे. मास्टर ब्लास्टर विक्रमादित्य सचिन तेंडुलकरची शाळा म्हणून शारदाश्रम नावारुपाला आली. केवळ दादरकरांमध्येच नाही, तर मुंबईकरांमध्येही परिचित असलेल्या या शाळेचे आता मात्र नाव पुसले जाणार आहे.

आता 'एस व्ही एम इंटरनॅशनल स्कूल'

सचिन तेंडुलकरची शाळा म्हणून ही शाळा प्रसिद्ध झाली. मात्र, या शाळेचं नाव आता कुठेही ऐकू येणार नाही. कारण या शाळेचं नाव आता बदलण्यात येणार आहे. या शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले जाणार असल्याने 'शारदाश्रम' हे जुने नाव पुसून 'एस. व्ही. एम. इंटरनॅशनल स्कूल' असे नाव करण्यात येणार आहे.

प्रस्ताव मंजुरीसाठी शिक्षण समितीकडे

डॉ. भवानी शंकर रोडवरील शारदाश्रम शाळेच्या व्यवस्थापनाने मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवून नाव बदलण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे नावात बदल करण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

मुदतवाढीनंतरही शाळा प्रशासनाचा निर्णय

शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेला ३१ मे २०२० पर्यंत मान्यता मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु शालेय व्यवस्थापनाने इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेच्या सभेमध्ये नावात बदल करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे.

शिक्षण उपसंचालकांची मान्यता

माध्यमिक शाळेच्या नावात बदल करण्यास मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेच्या नावात बदल करण्यासाठी महापालिका शिक्षण विभागाला पत्र पाठवले असून हे पत्र शिक्षण समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या