प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्यांना बसणार चाप, समितीची स्थापना

परीक्षेत कॉपी करण्यासाठी वॉट्सअपसारख्या सोशल मीडियाचा होत असलेला वाढता वापर रोखून मुंबईसहित राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी राज्य सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांमुळे प्रामाणिक व मेहनती विद्यार्थ्यांच्या मनोबलावर आघात होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांचा परीक्षा पद्धतीवरून विश्वास उडू नये, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत असेल तर त्याला पेपर फुटला असे म्हणता येणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले होते.

समितीमध्ये आठ जणांचा समावेश

आयुक्त, (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे (अध्यक्ष)
पोलीस आयुक्त, नवी मुंबई
विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर कक्ष
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
सेंट्रल बोर्ड फॉर सेंकडरी एक्जामिनेशन (सीबीएसई), दिल्ली
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

दोन महिन्यांपूर्वी बारावीचा पेपर सुरू होण्याच्या अवघ्या काही मिनिट अगोदर तो वॉट्सअपवर व्हायरल झाला होता. या गोष्टींना आळा घालण्यासाठी परीक्षा नियोजनातील त्रुटी दूर करणे, कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक नियम बनविणे यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या समितीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. गरज भासल्यास विविध विषयांशी निगडीत तज्ज्ञांनाही बैठकीत बोलावण्याचा अधिकार समितीला देण्यात आला आहे. या समितीने दोन महिन्यांच्या आत राज्य सरकारला अहवाल सादर करायचा आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या