अकरावी प्रवेशाची वेबसाईट बुधवारी दिवसभर बंद

नागरिकांना डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारचीच अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया राबवताना दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. वेबसाईट वारंवार हँग होणे, सर्व्हर स्लो चालणे यामुळे मागच्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे आॅनलाईन अर्ज भरताना त्रास होत होता. ऑनलाईन प्रवेशातील ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी बुधवारी दिवसभर वेबसाईट बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर 22 जूनला ऑनलाईन प्रवेश पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दहावीच्या निकालानंतर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आदी विभागांत अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. भाग 1 आणि भाग 2 अशा दोन टप्प्यांतील प्रवेश प्रकियेत भाग 1 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 30 हजार विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे शिल्लक राहिले आहेत. तर भाग 2 मध्ये 67 हजार 289 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत.

अशा आल्या अडचणी-

नायसा या कंपनीला अकरावी प्रवेशाची जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपनी नियंत्रीत संकेतस्थळ पहिल्याच दिवशी धीम्या गतीने चालत होते. अकरावी प्रवेशाचा अर्ज भरताना मुंबईतील विद्यार्थ्यांना बऱ्याच ठिकाणी सर्व्हर स्लो होणे, हँग होणे अशा अडचणींचा सामना करावा लागला.

बँडविथ वाढवणार -

या संदर्भातील तक्रारी मिळाल्यानंतर सर्व्हर आणि बँडविथ वाढविण्याबाबत तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात आली असून प्रवेश प्रक्रियेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी ही यंत्रणा अपडेट करण्यात येईल. बुधवारी संध्याकाळी सर्व तांत्रिक बाजू तपासल्यानंतर 22 जून रोजी सकाळी 10 वाजता पुन्हा प्रवेश प्रक्रिया पूर्ववत होईल. एक दिवस जास्त जाणार असला, तरी प्रवेश प्रक्रिया बिनचूक होईल. विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नसल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा - 

दहावीची पुरवणी परीक्षा 14 जुलैपासून


पुढील बातमी
इतर बातम्या