निकालांवरून विद्यार्थी संघटना बुचकळ्यात

रखडलेल्या निकालांवरून सर्वच विद्यार्थी मुंबई विद्यापीठावर एकमताने टीका करत असताना विद्यार्थी संघटना मात्र विद्यापीठाविरोधात नेमकी कुठली भूमिका घ्यायची यावरून बुचकळ्यात पडल्याचे दिसत आहे.

तिसरी डेडलाईन उलटली तरी मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे इतके दिवस शांत असलेल्या काही विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. तर काही संघटना नवीन कुलगुरूंना आणखी वेळ देण्याच्या मनस्थितीत आहेत. यावरून विद्यार्थी संघटनांमध्येच एकमत नसल्याचे दिसून येत आहे.

सर्वात पहिल्यांदा ३१ जुलै त्यानंतर ५ ऑगस्ट आणि आता १५ ऑगस्ट अशा तिन्ही डेडलाईन मुंबई विद्यापीठाने चुकवलेल्या आहेत. डॉ. संजय देशमुख निकालाची जबाबदारी झटकून गायब झालेले असताना निकाल लावण्यासाठी नवीन कुलगुरूंना लक्ष्य करायचे की निकाल वेळेवर लागावेत यासाठी प्रयत्न करायचे, अशा द्विधा मनस्थितीत विद्यार्थी संघटना आडकल्या आहेत.

राज्यपालांनी दिलेल्या दोन आणि कुलगुरूंनी स्वत: हून घेतलेली एक अशा तिन्ही डेडलाईन उलटून गेल्या आहेत. शांत बसल्यामुळे विद्यार्थ्यांना कुणीही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आहे. त्यामुळे रस्त्यावर न उतरता आता आम्ही मुंबई विद्यापीठाविरोधात न्यायालयीन लढा देणार आहोत. पण नवीन आलेल्या कुलगुरूंना थोडा अवधीही देणे आवश्यक आहे. कुलगुरूंची भेट घेतली असता ९० टक्के काम झाल्याचे त्यांनी सांगितले. पण निकाल वेळेत लागणे आवश्यक आहे. येत्या ४ दिवसांत निकाल लागले नाहीत, तर आम्ही न्यायालयीन लढा देऊ हे निश्चित.

- प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य, युवा सेना

तिसरी मुदत निघून गेली तरी जवळपास १४० निकाल जाहीर होणे बाकी आहेत. यामुळे एमबीए / एमएमएस किंवा मास्टर्स कोर्स अशा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. या परीक्षेत अयशस्वी झाल्यास उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी वेळ नसल्याने या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने परीक्षा निष्ठा समिती (Student'sExaminiation Grievance Committee) गठीत करावी. माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनीही अशा समितीची स्थापना केली होती.

- निखिल कांबळे, उपाध्यक्ष, एनएसयूआय, मुंबई

हे देखील वाचा -

अकरावीच्या पाचव्या विशेष फेरीची यादी जाहीर


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या