अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, ग्रेड पद्धतीनं विद्यार्थ्यांना पदवी द्या- उदय सामंत

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं 'यंदाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करा. ग्रेड पद्धतीने विद्यार्थ्यांना पदवी द्या', असं पत्र उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) लिहिलं आहे.

मंगळवारी फेसबुक लाईव्हदरम्यान त्यांनी याबाबतची माहिती दिली. 'मुंबई पुणे, नागपूर मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळं यंदाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणं देखील आम्हाला शक्य नाही. तसेच जरी या परीक्षा झाल्या तरी कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि हिताच्या दृष्टीने संकट उभं राहिलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता हे लक्षात घेत महाराष्ट्र शासन युजीसीकडं परवानगी मागत आहे. आम्हाला या परीक्षा घ्यायच्या नाहीत. या परीक्षा घेत नसताना कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, अशा पद्धतीची गुणांची सिस्टीम विद्यापीठाने अमलात आणावी' असं उदय सामंत यांनी म्हटलं.

'या पत्राचं उत्तर आल्यास सर्व बाजूंचा विचार करुन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय येण्यापूर्वी येत्या २ दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, परीक्षेसंदर्भात गठीत केलेल्या समितीचे सदस्य, तसेच सर्व विद्यापीठांचे कुलगुरु यांच्याशी चर्चा करुन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ग्रेडींग सिस्टीमचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल. बारावीनंतरच्या सीईटीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. याबाबत वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. त्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. पदवीसाठी असणारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या स्तरावर होणारी परीक्षा ही तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे', असंही त्यांनी म्हटलं.

पुढील बातमी
इतर बातम्या