कॉलेज कँटिनमध्ये आता नो पिझ्झा-बर्गर

मुंबई - जंक फूडमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी यूजीसीनं देशातली विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये जंक फूडवर बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे आता कॉलेजेसमध्ये जंक फूड मिळणार नाही. महाविद्यालयांतील कँटिनमध्ये पिझ्झा, बर्गरसारखं जंक फूड मोठ्या प्रमाणावर विकलं जातं. मात्र या पदार्थांमुळे विद्यार्थ्यांचं वजन अतिप्रमाणात वाढतं, असा आरोग्यतज्ज्ञांचा अहवाल आहे. त्याची यूजीसीने गंभीर दखल घेतली आहे. जंक फूडवर बंदी घालतानाच विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि त्याच्या दुष्परिणामांबाबत जागृती करण्याच्या सूचनाही यूजीसीनं दिल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांना बॉडी मास इंडेक्सबद्दल (बीएमआय) माहिती दिली जावी, असे यूजीसीचे सचिव प्रा. डॉ. जसपाल संधू यांनी सर्व विद्यापीठांना पाठवलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि कर्मचार्‍यांनाही आरोग्याबाबत टिप्स देण्याच्याही यूजीसीच्या सूचना आहेत. शिक्षकांना आरोग्याच्या समस्या आणि त्या दूर करण्यासाठी केले जाणारे उपाय याबद्दल माहिती दिली जावी, असंही परिपत्रकात म्हटलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या