आयआयटी मुंबईत व्हेज v/s नाॅन व्हेज वाद?

देशातील नामांकीत शिक्षणसंस्था अशी ओळख मिरवणारी, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देणारी आयआयटी मुंबई वैचारीकतेत मागास आहे की काय? अशी शंका उपस्थित करणारी एक घटना संस्थेच्या कॅम्पसमध्ये घडली आहे. आयआयटी मुंबई हाॅस्टेलच्या खानावळीत जेवणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने एक ई-मेल धाडून नाॅनव्हेज खायचं असेल, तर वेगळ्या ताटांत जेवा, अशी सूचना केली आहे. या ई-मेलमुळे आयआयटीच्या कॅम्पसमध्ये व्हेज विरूद्ध नाॅनव्हेज असा नवा वाद रंगला आहे.

कधी आला ई-मेल?

आयआयटी मुंबई प्रशासनाकडून हाॅस्टेल क्रमांक ११ मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ जानेवारी रोजी एक ई-मेल पाठवण्यात आला. या ई-मेलमध्ये नाॅन व्हेज खाणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्य प्लेट्स वापरण्याऐवजी वेगळ्या 'ट्रे टाईप' प्लेट्स वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. व्हेज खाणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून प्रशासनाने हा ई-मेल पाठवत नवा नियम लागू केल्याचं म्हटलं जात आहे.

या नव्या नियमाला विरोध करत विद्यार्थ्यांनी व्हेज, नाॅन व्हेज आणि जैन फूडसाठी वेगवेगळे काऊंटर्स असताना पुन्हा वेगळ्या प्लेट्स कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आयआयटीचा खुलासा

तर आयआयटीने यावर खुलासा करताना म्हटलं की, आयआयटीच्या सर्व हाॅस्टेलमध्ये व्हेज आणि नाॅन व्हेज जेवण वेगवेगळ्या काऊंटर्सवर देण्यात येतं. जेवणासाठी वेगवेगळ्या प्लेट्स वापरण्याची पद्धतही जुनी आहे. हाॅस्टेल ११ मध्ये नुकतंच नाॅन व्हेज जेवण देण्यास सुरूवात झाल्याने विद्यार्थ्यांना वेगळ्या डिश वापरण्याची माहिती व्हावी, म्हणून हा ई-मेल पाठवण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या