'विद्यापीठानं सरकारच्या योजनांची जाहिरात केली नसल्यानंच विद्यापीठाकडे दुर्लक्ष होत आहे. या जाहिराती विद्यापीठानं छापल्या असत्या तर सरकारने विद्यापीठाच्या समस्यांवर गंभीरतेने विचार केला असता. सरकारची जाहिरात छापली नाही, त्यामुळेच विद्यार्थी ‘लाभार्थी’ झाले नाहीत. जर तसं केलं असतं तर तेही लाभार्थी झाले असते', असं ट्विट करत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठ आणि सरकारला चांगलंच सुनावलं आहे.
याचसोबत आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठानं गुरुवारी बदलेल्या 'लॉ' परीक्षेच्या वेळापत्रकावरूनही ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. 'हा गोंधळ सरकारने लक्ष न दिल्यानेच होत आहे, ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा टोमणाही त्यांनी लगावला. मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या गोंधळावरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
सीए आणि 'लॉ'च्या परीक्षा एकत्र येत असल्याने गुरुवारी ‘सेव्ह मुंबई युनिर्व्हिसिटी’ मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्याची दखल घेत विद्यापीठाने त्वरित 'लॉ'च्या परीक्षा पुढे ढकलल्या. वेळापत्रक बदलासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आल्याने आदित्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर तोफ डागली.