कसा घडला सिनेसृष्टीतला 'विक्रम'!

मुंबई - अभ्यासू, चोखंदळ आणि शिस्तीचा कलावंत असे विविध कंगोरे असणाऱ्या दिग्गजांच्या यादीत विक्रम गोखले याचे नाव मानाने घेतले जाते. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटातून सहजगत्या रसिकांच्या मनाचा वेध घेण्यात यशस्वी ठरलेल्या या कसबी कलाकाराची अभिनय कारकीर्द प्रदीर्घ आहे.

अभिनयाची गेली 100 वर्षे जुनी परंपरा असणाऱ्या 'गोखले' कुटुंबियांचे विक्रम गोखले एक महत्वाचे शिलेदार आहेत! मात्र, घराणेशाहीच्या जोरावर अभिनयक्षेत्रात दमदार पाऊल टाकण्याचा मार्ग त्यांनी कधीच स्वीकारला नाही. त्यापेक्षा स्वकर्तृत्वाची कास धरत आणि अभिनयाचे सूक्ष्म कंगोरे आत्मसात करत आपला वेगळा ठसा उमटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तीन भाषेमध्ये काम करत विक्रम गोखले यांनी आपल्यातील कलावंताला अधिक प्रगल्भ केले.

अभिनय क्षेत्राची तब्बल 50 वर्ष अविरत सेवा करतच त्यांनी दुसरीकडे सामाजिक बांधिलकीचा वसा देखील जपला. अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी वडील चंद्रकात गोखले यांसोबत गेली कित्येक वर्ष ते सक्रिय कार्य करत आहेत. अशा या मातब्बर नटश्रेष्ठाच्या कारकीर्दीचा आढावा लवकरच माहितीपटातून घेतला जाणार आहे. थीम्स अनलिमिटेड आणि इंडियन फिल्म्स स्टुडिओच्या बॅनरखाली या माहितीपटाचे चित्रीकरण होत असून योगेश सोमण, आशिष वाघ आणि उत्पल आचार्य या तीन निर्मात्यांची फक्कड तिकडी याला लाभली आहे. तसेच या माहितीपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन विवेक वाघ करीत आहेत.

शेखर ढवळीकर लिखित या माहितीपटातून विक्रम गोखले यांच्या अभिनयाची प्रदीर्घ कारकीर्द रसिकांसमोर सादर केली जाणार आहे. या माहितीपटाबरोबरच विक्रम गोखले यांच्या आयुष्यातील महत्वाच्या लोकांकडून त्यांचा जीवनप्रवास देखील सांगितला जाईल, शिवाय, खुद्द विक्रम गोखले देखील आपल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करताना दिसतील.

पुढील बातमी
इतर बातम्या