विरप्पनची भूमिका साकारणाऱ्या संदीपला अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • मनोरंजन

हिंदी चित्रपटात कुख्यात गुंड चंदन चोर विरप्पनची भूमिका साकारणारा संदीप भरद्वाज आता रियल लाइफमध्ये वाम मार्गाला लागल्याचं दिसून आलं आहे. त्याच्याविरोधात वर्सोवा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे हा प्रकार?

मुंबईत शुक्रवारी दिवसभर धुलिवंदनाचा सण साजरा होत असताना, संदीप आणि त्याचा मित्र वर्सोव्यातील एका बारमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेले होते. नशा चढल्यानंतर संदीप आणि त्याचा मित्र अभय सिंग या दोघांनी सागर चौपाटी परिसरात पहाटे 4 च्या सुमारास गोंधळ घातला.

या प्रकारामुळे वैतागलेल्या तेथील एका नागरिकाने याबाबतची तक्रार पोलिस नियंत्रण कक्षाकडे केली. त्यानुसार वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संदीप आणि त्याच्या मित्राने पोलिसांशीच हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली.

प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा विरप्पन हा सिनेमा 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये संदीपने मुख्य कलाकार विरप्पनची भूमिका बजावली होती. संदीपची ही भूमिका इतकी गाजली होती की, त्यावेळी संदीपला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. हा चित्रपट कन्नड भाषेतही अनुवादित करण्यात आला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या