अमिताभ बालपणी कसे पहायचे सिनेमे ?

मुंबई - अलाहाबादमधील माझं बालपण मला अगदी छान आठवतं. विशेषतः चित्रपटांच्या आठवणी. त्या काळात माझे आई-वडील आधी चित्रपट पाहायचे. एखादा चित्रपट आम्हा मुलांना पाहण्याच्या लायक असला तरच मग ते चित्रपटांना घेऊन जायचे. अलाहाबादमधील कॅपिटॉल चित्रपटगृहात मी अनेक चित्रपट पाहिले असून तिथल्या अनेक आठवणी माझ्या मनात आजही आहेत, असं प्रतिपादन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी केलं.

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक भावना सोमय्या यांच्या 'वन्स अपॉन अ टाइम इन इंडिया' या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झालं. या वेळी ते बोलत होते. लॉरेल आणि हार्डी जोडीचा 'द फ्लाईंग ड्युसेस' हा बच्चन यांनी पाहिलेला पहिला चित्रपट. त्यानंतर सिंड्रेलाबरोबर डिस्ने कंपनीचे अनेक चित्रपट पाहिल्याचाही त्यांनी उल्लेख केला. लहान मुलांवर आधारलेला 'जागृही' हा आपण पाहिलेला पहिला हिंदी चित्रपट अशीही बच्चन यांनी या वेळी माहिती दिली.

अलाहाबादमधील कॅपिटॉल चित्रपटगृहात चांगला रंगमंचही होता. त्यावर पृथ्वी थिएटरची अनेक नाटके व्हायची. त्याचाही आपण आस्वाद घेतल्याचं बच्चन यांनी सांगितलं. कॅपिटॉल`मधील लाकडी बेंचवर बसून चित्रपट पाहण्यासाठी तिकीटाचा दर फक्त आठ आणे (50 पैसे) होता, अशी रंजक माहितीही बच्चन यांनी या वेळी दिली.

या पुस्तकाद्वारे भावना सोमय्या यांनी हिंदी चित्रपटांचे डॉक्युमेंटेशन केल्याबद्दल बच्चन यांनी त्यांचे अभिनंदन केले. 100 वर्षांचा हिंदी चित्रपटांचा इतिहास या पुस्तकातून नवीन पिढीला समजेल, असंही ते या वेळी म्हणाले.

 

 

पुढील बातमी
इतर बातम्या