शिल्पा शिंदेला करायचंय मराठी बिग बॉसचं सूत्रसंचालन

'भाभीजी घर पे है' या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे बिग बॉस सीझन ११ची विजेती ठरली. दरम्यान फिनालेच्याच दिवशी सलमान खानने मराठी बिग बॉसची घोषणाही केली. या घोषणेनंतर बिग बॉसच्या समस्त मराठी चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी शिल्पा शिंदेला मराठी बिग बॉस जिंकायचीही संधी असल्याची गंमत सलमानने केली. मात्र स्पर्धक म्हणून नाही तर मराठी बिग बॉसची सूत्रसंचालक म्हणून काम करण्याची इच्छा शिल्पाने बोलून दाखवली. 

शिल्पाला व्हायचय सूत्रसंचालक

पुन्हा छोट्या पडद्यावर काम करणार का असे शिल्पाला विचारले असता, पुन्हा मालिका करेन की नाही हे माहीत नाही, पण सलमाने सांगितल्याप्रमाणे मराठी बिग बॉस येत आहे. त्यामध्ये मला स्पर्धक म्हणून नाही तर त्याचं सूत्रसंचालन करायला आवडेल, असं ती म्हणाली.

रितेश देशमुखचीही आहे ही इच्छा

आता बिग बॉस मराठीत येणार असल्याची घोषणा सलमानने करताच त्याचं सूत्रसंचालन कोण करणार याविषयी अनेक नावं चर्चेत आली. २०१३ मध्ये रितेश देशमुखनेही 'बिग बॉस' मराठीत यावं ही इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता रितेश मराठीतील 'बिग बॉस' होस्ट करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन महिन्यांत सुरु होणार 'बिग बॉस मराठी'!

मराठी प्रेक्षकांमध्ये 'बिग बॉस'च्या याआधीच्या सीजनला मिळालेली लोकप्रियता पाहून या शोची निर्माता कंपनी असलेल्या 'एण्डेमॉल शाईन इंडिया'ने मराठी बिग बॉस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच बिग बॉसचा पहिला मराठी सीजन सुरु होणार आहे. 'एण्डेमॉल शाईन इंडिया'तील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन महिन्यांमध्ये हा मराठी सीजन सुरु होण्याची शक्यता आहे

पुढील बातमी
इतर बातम्या