महाराष्ट्रात जन्मला तो मराठी अशी संकल्पना काही पक्ष मांडत असले, बाॅलिवूडकरांना आर्थिक गणिताशिवाय समोर काहीही दिसत नाही, हेही तितकंच खरं. मात्र बाॅलिवूडमधील एक अॅक्टर असाही आहे, जो मुंबईत जन्मला, ज्याने मराठी मुलीसोबत लग्न केलं आणि आता तर तो चक्क आपला पहिलावहिला मराठी सिनेमा प्रोड्युस करतोय. या अॅक्टरचं नाव आहे, अजय देवगण. अजय 'आपला माणूस' हा मराठी सिनेमा प्रोड्युस करत असून त्याने सोमवारी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून पहिल्या मराठी प्रोडक्शन व्हेंचरची अधिकृत माहिती दिलीय. एवढंच नव्हे, तर काजोलशी लग्नानंतर मराठीवर प्रेम जडल्याची कबुलीही अजयने ट्विटरवरील व्हिडिओतून दिलीय.
मुंबई-पुणे-मुंबई, प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करतेय असे दमदार हिट सिनेमे देणारा प्रयोगशील दिग्दर्शक सतीश राजवाडे 'आपला माणूस'चं डायरेक्शन करत आहे. अजय प्रोडक्शनसोबत या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतही झळकणार आहे. हा सिनेमा ९ फेब्रुवारीला रिलिज होणार आहे.
ट्विटरवरील व्हिडिओत अजय म्हणतोय, ''सिनेसृष्टीत मला २५ वर्षे झाली. नवीन सिनेमा, नव्या भूमिका, नवीन कथा यांमुळे तुमच्यासोबत आपुलकीचं नातं निर्माण झालं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासोबतचं माझं नातं जन्मापासून आहे. मराठी भाषेसाठी नेहमीच आदर होता, पण काजोलशी लग्न केल्यानंतर मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करू लागलो. याच संस्कृतीमुळे मराठी सिनेमांची एक वेगळी ओळख असल्याचं समजलं. मराठी सिनेसृष्टीचा एक भाग होण्यासाठी 'आपला माणूस'मधून मी तुमच्यापुढे येत आहे.''
या आधी अजयने सिंघम या चित्रपटात मराठी पोलिसाची भूमिका बजावली होती. या सिनेमातील 'आता माझी सटकली' हा अजयचा डायलॉग चांगलाच फेमस झाला होता. 'आपला माणूस' या सिनेमात नाना पाटेकर, सुमीत राघवन, इरावती हर्षे अशी मोठी स्टारकास्ट आहे.