झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर बॉलिवुडची हवा हवाई गर्ल अवतरणार आहे. आपल्या आगामी 'मॉम' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्रीदेवीने झी मराठी थुकरटवाडीची वाट धरली होती. यावेळी तिच्या सोबत तिचे पती आणि या चित्रपटाचे निर्माते बोनी कपुर आणि सहअभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी हे सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी श्रीदेवी खास मराठमोळ्या अवतारात म्हणजे नऊवारी साडीत आली होती. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ३ आणि ४ जुलैला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.
ऐंशी आणि नव्वदचं दशक ज्या अभिनेत्रींनी गाजवलं त्यात अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे श्रीदेवी! 'सदमा', 'चांदनी'मधील संवेदनशील भूमिका असो की 'चालबाज'मधील बिनधास्त भूमिका, या तेवढ्याच सक्षमपणे सांभाळणारी अभिनेत्री अशी तिची ओळख.
या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने श्रीदेवी 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आली होती. यावेळी थुकरटवाडीच्या मंडळींनी सादर केलेल्या 'नागिन' चित्रपटाच्या स्किटवर श्रीदेवीने खळखळून हसत दाद दिली. याशिवाय 'इंग्लीश विंग्लीश'सारखा मराठी बिराठीचा क्लासही या मंचावर भरवण्यात आला आणि त्यानेही उपस्थितांना खळखळून हसवले.