ओम पुरी यांना श्रद्धांजली

मेकअपमागचा ओम पुरींचा चेहरा

गेल्या 35 वर्षांपासून मी ओमजींच्या सहवासात आहे. एक रंगभूषाकार या नात्याने मला त्यांचा दीर्घकाळ सहवास लाभला. ओमजी हे किती चांगले अभिनेते होते, हे साऱ्या जगालाच माहित आहे. मात्र त्यांच्यातला सज्जन माणूस मला इतकी वर्षे अनुभवायला मिळाला. ओमजींनी मला वैयक्तिक आयुष्यात बरीच मदत तर केलीच, तसेच ज्यांना ते ओळखतही नव्हते अशांनाही त्यांनी बरीच मदत केली. एका परिसंवादामधील विधानामुळे ओमजींवर काही महिन्यांपूर्वी मोठी टीका झाली. ही गोष्ट त्यांनाही खूप लागली होती. म्हणूनच ज्या जवानासंदर्भात ही गोष्ट घडली होती, त्या जवानाच्या घरी ते गेले. त्या जवानाच्या कुटुंबियांशी भेट घेऊन त्यांनी 10 लाख रुपयांचा धनादेशही दिला. मात्र या गोष्टीची त्यांनी कुठेही वाच्यता होऊ दिली नाही.

-विजय सावंत, प्रसिद्ध रंगभूषाकार

समर्पण असलेल्या भूमिका

अर्धसत्य चित्रपटामध्ये ओम पुरी यांनी साकारलेली प्रदीप वेलणकर ही व्यक्तिरेखा भारतीय हिंदी चित्रपटामधील एक सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा मानावी लागेल. तीन-चार दशकांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी ज्या भूमिका साकारल्या त्या अगदी समर्पण असलेल्या होत्या. श्याम बेनेगल, गोविंद निहलाणी या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधील त्यांचे काम आदर्श म्हणावे लागेल.

- डॉ. जब्बार पटेल, प्रसिद्ध दिग्दर्शक 

माणूस म्हणून श्रेष्ठ कलाकार

कलात्मक चित्रपटांची बीजे रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांमध्ये समावेश असलेली एक प्रमुख व्यक्ती म्हणजे ओम पुरी. व्यक्तीशः ते माझी काही जवळचे मित्र नव्हते. मात्र जेव्हा आमच्या भेटी व्हायच्या तेव्हा खूप छान वाटायचे. आमच्यात भरपूर गप्पा व्हायच्या. एक अभिनेता म्हणून त्यांची रेंज खूप मोठी होती. एक माणूस म्हणून हा कलाकार खूप श्रेष्ठ होता. जे मनात असे ते त्यांच्या जिभेवर यायचे आणि जे जिभेवर यायचे तेच मनात असायचे.

- जावेद अख्तर, प्रसिद्ध पटकथालेखक आणि गीतकार

पुढील बातमी
इतर बातम्या