'जाने भी दो यारो' क्लासिक सिनेमा पाहण्याची मुंबईकरांना संधी

'जाने भी दो यारो' हा क्लासिक सिनेमा आठवतोय का? आजच्या पिढीला हा सिनेमा कदाचित आठवत नसेल. कारण 12 ऑगस्ट 1983 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आपल्या आई-बाबा किंवा आजी-आजोबांनी नक्कीच हा चित्रपट पाहिलेला असेल. नसिरुद्दीन शहा, रवी वासवानी, ओम पुरी, सतीश शहा, पंकज कपूर यांचा धम्माल अभिनय, महाभारत नाटकावर चित्रीत केलेला सीन, द्रोपदीच्या वेशातला सतीश कुमार आणि या सर्वांचंही जबरदस्त कॉमिक टायमिंग, यामुळे आजही हा सिनेमा आठवला की हसू येतं.

या सिनेमाचं दिग्दर्शन कुंदन शहा यांनी केलं होते. एक उत्तम आणि अप्रतिम विनोदी सिनेमा म्हणून आजही या सिनेमाची ख्याती आहे. हा सिनेमा आजच्या पिढीला मोठ्या स्क्रिनवर पाहण्याची संधी मिळाली तर? सोन्याहून पिवळं असंच म्हणता येईल. अशी संधी तुम्हाला या रविवारी मिळू शकते.

का पाहावा हा चित्रपट

ओल्ड इज ऑलवेज गोल्ड हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल. या चित्रपटासाठी हे वाक्य तंतोतंत जुळतं. 80 च्या दशकात हा सिनेमा चांगलाच गाजला होता. दोन फोटोग्राफर ( नसरूद्दीन शहा आणि रवी वासवानी) मुंबईत स्ट्रगल करत एका वर्तमानपत्रात कामाला लागतात. याचदरम्यान एका मोठ्या बिल्डर (पंकज कपूर) विरोधात त्यांच्या हाती पुरावे लागतात. या बिल्डरचा एका घोटाळ्यात हात असतो. सत्य समोर आण्याचा प्रयत्न करणारे हे दोघं फोटोग्राफर एका दुसऱ्याच गुन्ह्यामध्ये अडकतात. दुसरीकडे बिल्डर त्याच्या विरोधात असलेले पुरावे मिळवण्यासाठी या फोटोग्राफरचा पाठलाग करतो. ते पुरावे बिल्डरला मिळतात का? दोघा फोटोग्राफर्सचं काय होतं? याची उत्कंठावर्धक कहाणी पाहण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल.

कुठे

3 डिसेंबर म्हणजेच रविवारी 4 वाजता वडाळ्याच्या आयमॅक्स थिएटरमध्ये तुम्हाला हा सिनेमा पुन्हा पाहण्याची संधी मिळणार आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला फक्त 180 रुपये मोजावे लागणार आहेत. 

पुढील बातमी
इतर बातम्या