अनुष्का शर्माविरोधात पालिकेत तक्रार

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माविरोधात शेजाऱ्यांनी के/वेस्ट पालिका कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. अवैधपणे इलेक्ट्रिक मीटर बोर्ड बसवल्या प्रकरणी शेजाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली असून, बोर्ड हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेने अनुष्का शर्माला नोटीस बजावली आहे.

अंधेरीमध्ये वर्सोवा परिसरात असलेल्या बद्रिनाथ टॉवरमध्ये अनुष्का सहकुटुंब 20 व्या मजल्यावर राहते. मात्र पॅसेजमध्ये शर्मा कुटुंबाने अवैधपणे इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स बसवल्याची तक्रार बद्रिनाथ टॉवरचे माजी सेकेट्ररी सुनील बत्रा यांनी केली आहे.

सुनील बत्रा यांनी 6 एप्रिलला पत्र लिहून महापालिकेकडे ही तक्रार केली आहे. बद्रिनाथ टॉवरमध्ये सोळावा आणि सतरावा मजला बत्रा यांच्या मालकीचा आहे. शर्मांनी बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक बॉक्सविरोधात बत्रा यांनी आधी अग्निशमन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना महापालिकेकडे तक्रार करण्यास सुचवण्यात आलं.

बत्रांच्या तक्रारीनंतर महापालिकेने शर्मांना नोटीस बजावली आहे. मात्र आपल्यावरील आरोप अनुष्काने फेटाळले आहेत. तसेच आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतरच पॅसेजमध्ये इलेक्ट्रिक बॉक्स बसवल्याचा दावा अनुष्काने केला आहे.

दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर मीटर बॉक्स आक्षेपार्ह असल्याचं सांगत शर्मा कुटुंबाने बॉक्स तात्काळ हटवावा असे आदेश दिलेत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बत्रा यांनी अनुष्कावर अनेक आरोप केले आहेत. तसेच अनुष्काने बिल्डिंगमधील अनेक नियमांचा भंग केल्याचा आरोपही यावेळी बत्रा यांनी केल्याची माहिती मिळते. मात्र अनुष्का शर्माच्या प्रवक्त्यांनी बत्रा यांनी स्वत: बिल्डिंगमध्ये अनेक ठिकाणी अवैध पार्किंग केल्याचे सांगत अनुष्कासोबत त्यांचे जुने भांडण असल्याचे सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या