प्राईम टाइमला मुंबईत Black Out होणारच- अनिल परब

ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा)च्या नव्या धोरणाविरोधात केबल आॅपरेटर्स अँण्ड ब्राॅडकास्ट असोसिएशननं आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार गुरूवारी, २७ डिसेंबरला प्राईम टाइमला, संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेत मुंबईसह राज्यभरातील केबल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र केबल चालकांमध्ये फूट पडल्याने विदर्भातील केबल चालकांनी या बंदमधून माघार घेतली आहे. असं असलं, तरी मुंबईसह अन्य ठिकाणचे केबल चालक बंदवर ठाम आहेत. त्यानुसार गुरूवारी प्राईम टाइमला मुंबईतील केबल सेवा बंदच (ब्लॅक आऊट) राहणार, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

निर्णयाला जोरदार विरोध

२९ डिसेंबरपासून देशभरातील केबल, टीव्ही, डीटीएच ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचा अधिकार देण्यात आलं आहे. त्यानुसार ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार वाहिन्या निवडता येणार असून त्यासाठी ग्राहकांना निश्चित दर मोजावे लागणार आहेत. मात्र या निर्णयाचा मोठा फटका देशभरातील केबल चालकांना बसणार असल्याचं म्हणत केबल चालकांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. या विरोधात मुंबईतील केबल चालक सरकारसमोर दंड ठोकून उभे आहेत. आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आक्रमक झालेल्या केबल असोसिएशनने बुधवारी एक बैठक घेत गुरूवारी प्राईम टाइमला ३ तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.

तात्पुरता दिलासा

केबल असोसिएशनच्या या इशाऱ्यानंतर ट्रायनं नरामाईची भूमिका घेत २९ डिसेंबरपासून केबल सेवा बंद करण्याचा निर्णय पुढे ढकलत केबल चालकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. ट्रायच्या या निर्णयानंतर विदर्भातील केबल चालकांनी गुरूवार-शुक्रवारच्या ३ तास केबल सेवा बंद ठेवण्याच्या निर्णयातून माघार घेतली आहे. मात्र मुंबईतील केबल चालक आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम असून गुरूवारी प्राईम टाइमला मुंबईतील केबल सेवा बंद राहणारच, असा इशारा परब यांनी दिला आहे.

८ हजार केबल चालकांचा सहभाग

केबल आॅपरेटर्स अॅण्ड ब्राडकास्ट असोसिएशनची बैठक असो वा केबस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय हा मुंबईपुरता होता. त्यात आम्हाला राज्यभरातील केबल चालकांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे कुणी एखाद-दुसरा केबल चालक बंदमध्ये सहभागी होणार नसला तरी त्याचा आंदोलनावर काहीही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया परब यांनी दिली आहे. गुरूवारच्या बंदमध्ये मुंबईतील ८ हजार केबल चालक सहभागी होतील आणि त्यामुळे मुंबईतील २५ लाखांहून अधिक टीव्ही बंद असतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

त्याचबरोबर स्टार इंडिया बुधवारच्या असोसिएशनच्या बैठकीला गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला विरोध करत असोसिएशनने शुक्रवारी स्टार इंडियाच्या परळच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतल्याचंही परब यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा-

प्राईम टाइमला ३ तास केबल बंद


पुढील बातमी
इतर बातम्या