कोरोनातून बरी होऊन बंगळुरुहून मुंबईला परतली दीपिका

१९ दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण, तिचे आईवडील आणि धाकट्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर, १३ मे रोजी या सर्वांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी समोर आली होती.

आता दीपिका कोरोनातून बरी होऊन बंगळुरुहून मुंबईला परतली आहे. रविवारी ती मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी तिचा पती रणवीर तिच्यासोबत दिसला. दरम्यान, दोघांचे फोटो क्लिक करणा-या फोटोग्राफर्सनी दीपिकाला तिच्या प्रकृतीविषयी विचारणा केली असता, तिनं केवळ थम्स अप केला.

काही दिवसांपूर्वी दीपिका तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी बंगळुरुला गेली होती. तिथंच तिलादेखील कोरोना संसर्ग झाला होता. तिचे वडील आणि माजी राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना संसर्ग झाल्यानंतर बंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतें. तर दीपिका तिच्या आई आणि बहीणसह होम आयसोलेशनमध्ये होती.

दीपिका पदुकोणनं कोरोना महामारीच्या काळात मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रस्त लोकांसाठी अलीकडेच काही हेल्पलाईन नंबर शेअर केली होती. जेणेकरून या काळात लोक एकाकीपणाच्या भावनेला बळी पडणार नाहीत आणि सोबतच आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनात येणार नाहीत. 

याविषयी दीपिकानं लिहिलं होतं की, आपल्यातील लाखो लोक, अगदी मी आणि माझे कुटुंबसुद्धा एकमेकांपासून दूर राहून संघर्ष करीत आहेत. आपण हे विसरू नये की, सद्य परिस्थितीत सर्वांनी स्वतःची इमोशनल काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, आपण एकटे नाहीत. या संकटात आपण सर्वजण एकत्र आहोत.


पुढील बातमी
इतर बातम्या