फुलवा खामकर शिकवणार ऑनलाईन डान्स

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

मुंबई - नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर ऑनलाईन डान्स प्रशिक्षणाचे धडे देणार आहे. 'डान्स विथ फुलवा'चा पहिला एपिसोड प्रेक्षकांना 17 मार्चला 'राजश्री मराठी' या युट्युब चॅनलवर पाहायला मिळेल. त्यानंतर दर शुक्रवारी 'डान्स विथ फुलवा'चे एक-एक एपिसोड युट्युब चॅनलवर पाहायला मिळतील. तसेच 8 मार्च महिला दिनानिमित्त फुलवा तिच्या या नव्या उपक्रमाची एक झलक दाखवणार आहे.

फुलवा तिच्या ऑनलाईन डान्स प्रशिक्षणातून कथ्थक ते कंटेम्पररी डान्सचे प्रशिक्षण देणार आहे. 'डान्स विथ फुलवा' या मराठीतील पहिल्या ऑनलाईन नृत्य प्रशिक्षणाबाबत फुलवा म्हणाली की, "मराठीत ऑनलाईन नृत्याचे प्रशिक्षण हा उपक्रम पहिल्यांदाच होणार आहे. क्लासमध्ये मुलांना शिकवणे आणि ऑनलाईन शिकवणे यात फरक आहे. क्लासमध्ये मी ज्या साध्यासोप्या पद्धतीने प्रशिक्षण देते तसेच ऑनलाईन प्रशिक्षणदेखील असेल. मराठी चित्रपटातल्या गाण्यांवर भारतीय आणि पाश्चिमात्य नृत्य प्रकार कसे करता येतील याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

फुलवा 'बुगी वुगी' या सुप्रसिद्ध डान्स शोच्या पहिल्या सीझनची विजेती होती. तर 'डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स'च्या सिझनमध्ये ती टॉप 5 मध्ये दावेदार होती. फुलवाने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्यदिग्दर्शन केले आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या