रामूचं सनी लिऑनेवर वादग्रस्त ट्वीट

मुंबई - सिने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. महिला दिनाच्या शुभेच्छा देत राम गोपाल वर्मा यांनी एक ट्विट केलं. ‘सनी लिओनीप्रमाणे सर्व महिलांनी पुरुषांना समाधान द्यावे असं सांगत मी जगातल्या तमाम महिलांना शुभेच्छा देतो,’ असं म्हणत त्यांनी ट्विटमधून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या शुभेच्छांनंतर ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे. महिला दिनीच अशा प्रकारे वादग्रस्त ट्विट करून रामगोपाल वर्मा यांनी पुन्हा एकदा वादाची राळ उठवून दिली आहे.


राम गोपाल वर्मांच्या या ट्वीटनंतर नेटीझन्सनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र त्यालाही वर्मांनी प्रत्युत्तर दिलंय. मात्र या उत्तरामध्येही त्यांनी पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. 'माझ्या ट्विटनंतर नेटीझन्समध्ये जी काही नकारात्मत प्रतिक्रिया उमटली आहे ती निव्वळ हिप्पोक्रसी आहे. सनी लिओने ही इतर कोणत्याही महिलेपेक्षा अधिक प्रामाणिक असून तिला स्वत:बद्दल अधिक आदर आहे' अशा आशयाचं ट्वीट वर्मांनी केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या ट्विटवरून कोणता नवीन वाद निर्माण होतो याचीच चर्चा सुरु आहे.


तर राम गोपाल वर्मांच्या या आक्षेपार्ह ट्वीटचा नेते मंडळींनीही चांगलाच समाचार घेतलाय. राम गोपाल वर्मांनी माफी मागीतली नाही तर चपला मारो आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार विद्या चव्हाण यांनी दिलाय. तर महिलांविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जावी असं वक्तव्य सपाचे नेते अबू आझमी यांनी केले आहे. राम गोपालसारखे व्यक्ती फक्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ट्वीट करतात असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तर राम गोपाल वर्मांना धडा शिकवणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या