करण जोहर म्हणाला, "८ लोकांच्या एकत्रित येण्याला पार्टी म्हणत नाही"

गेल्या दोन दिवसांपासून करण जोहर आणि करीना कपूर यांच्यावर पार्टी करून कोरोना पसरवल्याचा आरोप केला जातोय. करीना कपूरनंतर आता करण जोहरनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्पष्टीकरण दिलं आहे.

करणनं सांगितलं की, त्याचा आणि कुटुंबाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांच्या घरी फक्त ८ लोकांची गँदरिंग होती. कोणतीही पार्टी तिथे आयोजित करण्यात आली नव्हती.

करणनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यानं लिहिलं- “मी मुंबई महापालिकेनं घेतलेल्या सर्व प्रयत्नांचे आणि शहर सुरक्षित ठेवणाऱ्या सर्वांचेच मनापासून कौतुक करतो. त्यांना माझा सलाम. दरम्यान मी माझ्या काही मीडियाच्या सदस्यांना स्पष्टीकरण देऊ इच्छितो की ८ लोकांच्या एकत्रित येण्याला पार्टी म्हणत नाही. माझ्या घरात कोविडचे सर्व प्रोटोकॉल पाळले जातात. त्यामुळे ते निश्चितच कोरोनाचे हॉटस्पॉट असू शकत नाही. आम्ही सर्व जबाबदार लोक आहोत. आम्ही प्रत्येकवेळी मास्क घालतो. कोणीही कोरोना महामारीला हलक्यात घेतलेले नाही. त्यामुळे मी प्रसारमाध्यामांच्या काही सदस्यांना थोडा संयम ठेवण्याचे आवाहन करतो. त्यांनी तथ्य नसलेले वृत्त देणे टाळावे, अशी विनंतीही करतो,” असे करण जोहर म्हणाला.

करण जोहरच्या कुटुंबातील १० लोकांव्यतिरिक्त त्याच्या इमारतीतील सुमारे ४० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचे घरही सॅनिटाइज करण्यात आले.

करीना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान, महीप कपूर आणि सोहेल खान याच्या मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर करण जोहरच्या इमारतीतही कोरोना चाचणी घेण्यात आली होती. करीनानं स्वतःला आयसोलेट केलं आहे.

तिनं एक निवेदन जारी केलं आहे की, करणच्या घरी झालेल्या गेट-टूगेदरमध्ये सीमा खानला बरे वाटत नव्हते, तिला खोकला होता.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "बॉलिवूडकरांनी नियम पाळायला हवेत. तसंच राजकीय लोकांनी देखील नियमांचे पालन करायला हवे. ग्रॅन्ड हयातमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नियम मोडले जात आहेत. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा सध्या होम क्वारंटाईन आहेत. दोघींवर पालिकेचे लक्ष असणार आहे. करीना कपूरला दोन लहान मुले आहेत, तरी इतकं बिनधास्त."


पुढील बातमी
इतर बातम्या