करिनाशी बोलण्याची ओढ आली अंगाशी !

मुंबई - "वो सिर्फ स्टार नही है, दुनिया है मेरी" शाहरुख खानच्या फॅन चित्रपटातील हे वाक्य करिना कपूरच्या एका चाहत्याला चांगलंच महागात पडलंय. करिनाचं इन्कमटॅक्स ई-फायलिंगचं अकाउंट हॅक केल्याबद्दल सायबर पोलिसांनी मनिष तिवारी नावाच्या करिनाच्या एका फॅनला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा मनिष तिवारी केंद्रीय निमलष्करी दलातील कर्मचारी आहे.

तिवारी हा करीनाचा चहाता असून त्याला आपल्या लाडक्या अभिनेत्रीशी बोलण्याची इच्छा होती. पण तिचा मोबाइल नंबरच नसल्यानं तो काहीही करू शकत नव्हता. पण मनिषने इंटरनेटवरून अखेर करिना कपूरचा पॅन कार्ड नंबर शोधून काढला. त्यानंतर त्याने आयटी रिटर्न भरून खात्याचा पासवर्ड देखील बदलला. तिवारी हा त्याच्या मित्रांचा आयटी रिटर्न भरत असून, रिटर्न भरल्यावर मिळणाऱ्या पावतीत खातेधारकाचा नंबर मिळत असल्याचा या मनिषचा अंदाज होता. त्यामुळे त्याने एवढा घाट घातल्याचं सायबर पोलिसांनी सांगितलं. पण एवढं करूनही करिनाचा नंबर काही मिळालाच नाही.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात करीना कपूरचं इन्कंमटॅक्सच्या ई-फायलिंगचे अकाउंट एका अज्ञात व्यक्तीने हॅक करून रिटर्न्स भरला होता. त्यानंतर करिनाच्या सीएने तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा देखील दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलीस या मनिष तिवारीपर्यंत पोहचले.

पुढील बातमी
इतर बातम्या