मुंबई - जॅकी चॅनचा चित्रपट म्हटला की स्टंट्स आणि थराराची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. गेल्या अनेक वर्षांपासून जॅकीनं हा जॉनर आपल्या कर्तृत्वामुळे मोठा केला आहे. मात्र अनेकदा मोठेपणा बडेजाव मिरवण्याच्या नादात सगळी गडबड होते. अशीच काहीशी गडबड कुंग फू योगा चित्रपटात झाली आहे. दोन-चार साहसी स्टंटस, तेवढेच विनोद आणि व्हिज्युअली ट्रीट ठरणारी काही दृश्यं सोडल्यास कुंग फू योगा
म्हणजे नुसता लुटूपुटूचा थरार ठरतो. कोणत्याही कलाकृतीला कथानकाचा भक्कम पाया नसेल तर ती कलाकृती नुसती पत्त्याच्या बंगल्यासारखी तकलादू भासते, याचा प्रत्यय हा चित्रपट पाहताना सतत येतो.
चीनमधील एका म्युझिअममध्ये जॅक (जॅकी चॅन) हा पुरातत्त्वतज्ज्ञ कार्यरत असतो. एके दिवशी त्याला भारतामधून अश्मिता (दिशा पटनी) आणि तिची सहकारी कायरा (अमायरा दस्तूर) भेटायला येते. अश्मिताकडे एक हजार वर्षांपूर्वीचा भारतामधील मगधनगरीचा नकाशा असतो. या नकाशानुसार सुवर्णखजिना तिथं दडलेला असतो. या खजिन्याची शोधमोहिम जॅकनी सुरू करावी, अशी विनंती अश्मिता करते. या विनंतीचा मान ठेवून जॅक आणि त्याचे इतर काही सहकारी या शोधमोहिमेवर निघतात. ही शोधमोहिम तिबेट ते राजस्थान व्हाया दुबई अशी होते. या मोहिमेत जॅकला मोठा अडथळा ठरतो तो रॅंडल (सोनू सूद). त्याला या नकाशाची आणि संभाव्य खजिन्याची माहिती मिळते. हा खजिना सरकारचा नसून आपला असल्याचा दावा करत तो जॅकच्या जीवावर उठतो. शेवटी या मोहिमेत बाजी कोण मारतो, हे पडद्यावर पाहिलेलं बरं.