पहिला मराठमोळा रॅपर..श्रेयस जाधव!

मुंबई - हिंदी सिनेमांमध्ये दिसून येणारे अनेक ट्रेंड आता मराठीतही रुजू लागले आहेत. मग ते चित्रपटाच्या बाबतीत असो वा संगीताच्या ! मराठी सिनेसृष्टी कुठेच मागे पडत नाही. याचे मोठे उदाहरण म्हणजे मराठमोळ्या संगीतात ‘रॅपसॉंग’चा नवा ट्रेंड लवकरच रुजू होणार आहे. अर्थात, यापूर्वी मराठीच्या काही पॉप गाण्यांमध्ये रॅपचा वापर केला असला तरी, प्रथमच एक संपूर्ण गाणं ‘रॅप'मध्ये सादर होणार आहे. आजच्या इंग्रजाळलेल्या मराठी तरुणाईला भुरळ घालणाऱ्या 'रॅपसॉंग' चे मराठीकरण करण्याचे काम निर्माता आणि गायक श्रेयस जाधव याने केले आहे.

'ऑनलाईन बिनलाईन' या सिनेमाची निर्मिती करणारा श्रेयस जाधव एक चांगला रॅपर देखील आहे. या सिनेमातील 'ओ हो काय झालं’ या हरिहरन आणि लेसली लुईस यांच्या गाण्यामध्ये श्रेयसनं दिलेला रॅपिंगचा तडका आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे रॅपचा हा ट्रेंड चालू ठेवत, संपूर्ण रॅप असलेलं 'पुणे रॅप' हे गाणं तो प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. हे गाणं पुण्याबद्दल असून यात पुणेरी वैशिष्ट्यांचा उल्लेख तर आहेच, पण त्यासोबतच प्रसिद्ध शनिवारवाड्याचं भव्य दिव्य रूपही यात पाहायला मिळणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईला हे गाणं ठेका धरायला भाग पाडेल, असा श्रेयसचा विश्वास आहे. मराठी चित्रपटाचा तरुण निर्माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रेयसची निर्मिती असणारे 'बघतोस काय मुजरा कर' आणि 'बसस्टॉप' हे दोन सिनेमे देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. हे नवीन वर्ष श्रेयससाठी दुहेरी धमाका ठरणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या