'बाहुबली २'ची जादू फक्त सर्वसामान्यांवरच नाही तर मुंबई पोलिसांवरही झाली आहे. म्हणूनच की काय, पोलिसांनी ट्रॅफिकचे नियम मुंबईकरांना समजवण्यासाठी बाहुबलीची मदत घेतली आहे.
आता तुम्ही म्हणाल की, बाहुबली चक्क ट्रॅफिकचे नियम सांगायला मुंबईच्या रस्त्यांवर उतरणार की काय? पण तसं काहीही होणार नाही. बाहुबली चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होताच पोलिसांना एक आयडियाची कल्पना सुचली. फक्त सुचलीच नाही तर ती कल्पना पोलिसांनी चक्क लगेच अमलातही आणली. बाहुबलीच्या लोकप्रियतेचा फायदा घेत मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केलं. बाहुबलीचं पोस्टर ट्विट करत पोलिसांनी दोन प्रश्न मुंबईकरांना विचारले आहेत.
कटप्पानं बाहुबलीला का मारलं? आणि लोकं वाहतुकीचे नियम का पाळत नाहीत? असे दोन प्रश्न पोलिसांनी मुंबईकरांना विचारले आहेत. त्यासोबतच, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊ शकता, असं ट्विट पोस्टरसोबत करण्यात आलंय.
मुंबई पोलिसांच्या ट्विटला मुंबईकरांनीही प्रतिक्रिया दिल्यात. मुंबई पोलिसांच्या या युक्तीचे काहींनी कौतुक केलं आहे. तर काहींनी मुंबई पोलिसांवर टीकाही केली.
#BahubaliOfTrafficDiscipline हा हॅशटॅगही मुंबई पोलिसांनी सुरू केलाय. मुंबई पोलिसांच्या या प्रयत्नांना किती यश येतं हे माहित नाही. पण त्यांनी उचललेलं पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.