नवाजुद्दीनच्या जाहिरातीचा भारत आणि पाकिस्तानमध्ये विरोध

प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सामाजिक भान असलेला कलावंत म्हणून सिनेसृष्टीत ओळखला जातो. परंतु त्याने केलेल्या वॉशिंग मशीनच्या जाहिरातीवरून सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगलीय. विशेषकरून या जाहिरातीला पाकिस्तानमधून जबरदस्त विरोध होत असून देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही या जाहिरातीचा निषेध करण्यात येतोय. ही जाहीरात फक्त पाकिस्तानमध्ये प्रसारित करण्यात आली आहे.


https://t.co/Owm1dsoZHC

— Imperial Marcher (@MavIncognito) May 6, 2017



या जाहिरातीत नवाजुद्दीन 'मी आज माझ्या पत्नीची खूप धुलाई केली', असे मित्रांना सांगताना दिसत आहे. यातून स्त्रिया आणि पाकिस्तानी संस्कृतीबद्दल चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचत असल्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाकिस्तानी सोशल मीडियावर उमटताहेत. भारत आणि पाकिस्तानसारख्या विकसनशील देशांमध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असताना, विशेषकरून महिलांना होणारी मारहाण हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असताना या मुद्द्याची अशाप्रकारे खिल्ली उडविण्याच्या प्रकारावर परखड टीका करण्यात येतेय.

महिला म्हणजे मारहाण, धुलाई करण्याचे साधन नाही. संबंधित जाहिरातीत महिलांना मारहाण करण्याचे वाक्य वापरण्यात आलेय. त्यातून पुरुषी मानसिकता दिसून येतेय. सद्यस्थितीत कुठल्याही प्रॉडक्टची जाहिरात असो, ती महिलांच्या सहभागाशिवाय पूर्णच होत नाही. प्रत्येक जाहिरातीत कमी कपडे घातलेली माहिला दाखविण्यात येते. आणि या जाहिरातीत तर विनोदाच्या नावाखाली महिलांची खिल्लीच उडविण्यात आलीय. पत्नी ही धुलाई करण्यासाठी असते, असा चुकीचा संदेश या जाहिरातीतून जातोय. एका उत्तम अभिनेत्यकडून अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. 

- विद्या चव्हाण, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस


अशा प्रकारची विकृत जाहिरात बनविणारे यांचीच धुलाई करण्याची गरज आहे. देश कुठलाही असो, स्त्रियांबद्दल चुकीचा संदेश देणारी जाहिरात नवाजुद्दीनने केली, हेच निषेधार्ह आहे. 

- अभिजीत पानसे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना

पुढील बातमी
इतर बातम्या