प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी कालवश, ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ मुळे चर्चेत

प्रसिद्ध उर्दू गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं.तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर खूप चर्चेत आला होता. सोशल मीडियावर तर हा शेर खूपच लोकप्रिय झाला होता. 

राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आढळल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातचं त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली. राहत इंदौरी आधीपासून अनेक आजारांनी ग्रस्त होते. त्यांना मधुमेहाचा आणि हृदयाचा आजार होता. त्यांना ६० टक्के निमोनिया होता. याशिवाय त्यांचं ७० टक्के यकृत खराब होतं.

कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी कोरोना चाचणी करण्यात आली. माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल, अशी माहिती इंदौरी यांनी ट्विटर हँडलवरून दिली होती. 

पुढील बातमी
इतर बातम्या