“BIGG BOSS” मराठी सर्वांना ”वेड” लावायला येतोय...

नुकतीच ‘मराठी बिग बॉस’च्या पाचव्या सीझनची घोषणा झाली असून, या पर्वात सूत्रसंचालन कोण करणार, हे देखील समोर आले आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी सीजन ५’चा पहिला टीझर शेअर करण्यात आला असून, यामध्ये महेश मांजरेकर नाही तर अभिनेता रितेश देशमुख यंदा बिग बॉसच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसणार असल्याचं, जाहीर करण्यात आलं आहे.

नुकताच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी ५’चा टीझर शेअर करण्यात आला असून, या टीझर व्हिडीओमध्ये प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख ‘बिग बॉस’च्या अंदाजात दिसला आहे. सोबतच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, ‘मराठी मनोरंजनाचा “BIGG BOSS”... सर्वांना”वेड”लावायला येतोय...“लयभारी”होस्ट,सुपरस्टार रितेश देशमुख!! फक्त कलर्स मराठीवर आणि@officialjiocinemaवर’ असं म्हणण्यात आलं आहे.

महेश मांजरेकर यांनी तब्येतीच्या कारणामुळे मागच्याचा पर्वात आपण आता कदाचित पुढच्या पर्वात दिसणार नाही, अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, काही काळापूर्वी त्यांनी आपल्याला विचारणा झाल्यास सूत्रसंचालन करण्याचा विचार नक्की करू, असे देखील म्हटले होते.

मात्र आता त्यांच्या जागी रितेश देशमुखची वर्णी लागल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आजवरच्या चार ही सीझनमध्ये महेश मांजरेकर यांनी आपल्या कणखर आणि डॅशिंग पर्सनॅलिटीने स्पर्धकांची नेहमीच चांगली शाळा घेतली होती.

प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी रितेश देशमुखला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. कमेंटच्या माध्यमातून चाहते रितेश देशमुख याला शुभेच्छा देत आहेत. मात्र, या सीझनमध्ये कोण कोण झळकणार हे अद्याप समोर आलेले नाही. कोणते कलाकार या ‘बिग बॉस मराठी सीजन ५’ च्या पर्वात सहभागी होणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. लवकरच स्पर्धकांची यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

OTT वर सत्य घटनांवर आधारित के-ड्रामा पाहा

पुढील बातमी
इतर बातम्या