अमृतमहोत्सवी ‘हसता हुआ नूरानी चेहरा’

नृत्याच्या अदाकारीने ब्लॅक अँड व्हाईट जमानाही रंगीन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जीवनकला केळकर यांनी आज पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलं आहे... पण त्यांच्यावर चित्रीत झालेलं ‘पारसमणी’ सिनेमातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा...’ हे गाणं मात्र आजही त्यांच्याप्रमाणेच चिरतरुण आहे...

नावाप्रमाणेच जीवन जगण्याची कला आत्मसात करत भारतीय सिनेसृष्टीला नृत्याचा अद्वितीय नजराणा देणाऱ्या जीवनकला यांनी पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलं असलं, तरी मनानं आणि शरीरानं आजही त्या चिरतरुण आहेत.

मागच्याच आठवड्यात शिवाजी मंदिर  इथं झालेल्या ‘लक्ष्मीकांत नाइट्स’मध्ये धडाकेबाज डान्स करत त्यांनी याची साक्ष पटवून दिली. वाढदिवसाचं औचित्य साधत ‘मुंबई लाइव्ह’शी दिलखुलास गप्पा मारताना जीवनकला यांनी अल्पावधीत आपला संपूर्ण जीवनपटच उलगडला...

घरातच बाळकडू...

आई गंगूबाई आणि बाबा आर. डी. कांबळे हे कलाकार असल्यानं जीवनकला यांना घरातच अभिनय आणि नृत्याचं बाळकडू पाजलं गेलं. याबद्दल जीवनकला म्हणाल्या की, ''आईने बऱ्याच मराठी, हिंदी आणि इंग्रजी सिनेमांमध्ये अभिनय केला, पण माझ्या जन्मानंतर तिने अभिनय करणं थांबवलं. सर्व लक्ष माझ्या भविष्यावर केंद्रित केलं.''

लतादीदींनी केलं नामकरण...

''त्या काळी माझे आई-वडील पुण्यात राहात होते आणि तिथंच मंगेशकर कुटुंबियही होतं. आमचं त्यांच्याशी घनिष्ठ घरगुती संबंध होतं. लतादीदींनीच बारशाच्या दिवशी माझं ‘जीवनकला’ असं नामकरण केलं. दीदी ज्योतिषशास्त्र जाणत असल्यानं ‘ही मुलगी मोठी होऊन खूप नाव कमवेल’, असं भविष्य त्यांनी वर्तवलं होतं, जे तंतोतंत खरं ठरलं.''

तिसऱ्या वर्षी पहिला परफॅार्मन्स...

वयाच्या तिसऱ्या वर्षी मला साने गुरुजींची कथा असलेल्या ‘तीन मुलं’ या सिनेमात काम करण्याची पहिली संधी लाभली. त्या सिनेमात मी नायिकेच्या मुलीचं काम केलं होतं. ७ वर्षांची असताना ‘अखेर जमलं’मध्ये सूर्यकांत यांची बहीण बनले. तेव्हा मी बेबी शकुंतला म्हणून ओळखले जायचे.

मेळ्यामध्ये डान्स करायचे...

पुण्यामध्ये असताना मेळ्यामध्ये खूप डान्स केला. इतक्या लहान वयात गणपतीसमोर मी केलेला डान्स पाहून लोकं बेहद्द खूश व्हायचे. तिथले व्यापारी, मंडईवाले माझ्या गळ्यात पैशांची माळ घालायचे. जणू मला गणपतीच पावला होता. नागपूर, अकोल्यासह महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी डान्स केला.

मुंबईत लतादीदींकडे आले...

लतादीदींनी मला पुण्याहून मुंबईला यायला सांगितलं. मुंबईत आल्यावर सुरुवातीला वाळकेश्वरला त्यांच्या घरीच राहायला होते. त्यांच्या सहवासात राहून बरंच काही शिकले. दीदींची खूप मदत झाली. ‘गूंज उठी शहनाई’मध्ये त्यांनी मला ब्रेक मिळवून दिला. या सिनेमातील ‘अखियाँ भूल गयी रे सोना...’ हे गाणं लोकांना खूप आवडलं.

मधुबालासोबतही अभिनय...

‘हिमालय की गोद में’ या सिनेमात माला सिन्हासोबत काम केल्यानंतर ‘कल हमारा है’मध्ये मधुबालासोबत अभिनय केला. या सिनेमात अमजद खानचे वडील जयंत यांच्यासमोर शीला काश्मिरीसोबत ‘ऐसे न देखो रसिया...’ या गाण्यावर नृत्य केलं. ‘खानदान’ सिनेमातील ‘मिट्टी में मिल गयी जवानी...’ हे हेलनसोबतचं गाणंही लोकप्रिय झालं.

मैलाचा दगड ‘पारसमणी’...

ट्रीक मास्टर-दिग्दर्शक बाबूभाई मिस्त्री यांच्या ‘पारसमणी’ सिनेमातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा...’ हे गीत नलिनी चोणकर आणि माझ्यावर चित्रीत करण्यात आलं. या गीतामुळे करियरला कलाटणी मिळाली. या गाण्यावर आम्ही ८ दिवस मेहनत घेतली होती. सत्यनारायण गुरुजींनी आमचा डान्स बसवला होता. महिपाल आणि गीतांजली मुख्य भूमिकेत होते. सर्वांनी त्याकाळीही खूप कौतुक केलं आणि आजही होत आहे.

‘हात नका लावू माझ्या साडीला...’

‘हसता हुआ नूरानी चेहरा...’ या गाण्याइतकीच ‘हात नका लावू माझ्या साडीला...’ ही लावणीही हिट झाली. ‘मराठा तितुका मिळवावा’ या सिनेमातील हे गाणं. लतादीदीच या सिनेमाच्या निर्मात्या होत्या आणि संगीतकारही. भालजी पेंढारकरांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाला लतादीदींनी आनंदघन या नावाने संगीत दिलं. मला मार्गदर्शनही केलं. “डान्स खूप फास्ट नको. त्या काळी हळूहळू डान्स करायचे. डोक्यावरचा पदर ढळू देऊ नको”, असं त्यांनी प्रेमानं शिकवलं.

‘जिथे सागरा धरणी मिळते...’

‘पुत्र व्हावा ऐसा’ या सिनेमातील ‘जिथे सागरा धरणी मिळते...’ हे गाणं आजही लोकांच्या ओठांवर आहे. ‘अखेरचा हा तुला दंडवत...’, ‘साडी दिली शंभर रुपयांची...’, ‘गुलाबी पत्र आलंय मला...’ अशी एका पेक्षा एक मराठी गाणी केली.

दिग्गजांचा सहवास...

लतादीदींसोबतच सुलोचनादीदींचाही सहवास लाभला. फिरोज खान हा हिंदीतील माझा पहिला हिरो. किशोर कुमार, अनुप कुमार, अशोक कुमार, शम्मी कपूर, मनोज कुमार, गीता दत्त, प्राण, कुमकुम, नानूभाई भट (आलिया भटचे आजोबा), मीनाकुमारी, वैजयंती माला, मधुबाला, माला सिन्हा, हेलन, मेहमूद, मुक्री, पद्मिनी, नीशी अशा त्या काळातील आघाडीच्या कलाकारांसोबत काम केलं.

मराठीतील मातब्बरही साथीला...

दुर्गा खोटे, नीलम, रमेश देव, सचिन पिळगावकर, राजा परांजपे, राजा गोसावी, जयश्री गडकर, आनंद माने, सूर्यकांत, पद्मा चव्हाण, विवेक अशा बऱ्याच मराठी गुणी कलावंतांच्या साथीनं माझं करियर कसं घडत गेलं ते समजलंही नाही.

आई-बाबांची एकुलती एक...

आई-बाबांनी मला खूप लाडानं वाढवलं. कधी मला कष्ट पडू दिले नाहीत. माझं नशीब बलवत्तर आहे. बालपणापासूनच नाव आणि पैसे भरपूर कमवले. मला वेस्ट इंडिजहून राम नावाच्या मुलाचं स्थळ आलं होतं, पण आई-वडिलांना सोडून गेले नाही.

सुलोचनादीदींनी आणलं स्थळ...

नंतर योगायोगाने प्रसिद्ध लेखक राम केळकरांशी माझं लग्न झालं. सुलोचनादीदींनी बाबांना सांगितलं की, ‘माझा एक दत्तक पुत्र आहे राम. त्याच्याशी जीवनकलाचं लग्न लावून द्या.’ सुलोचनादीदींनीच नाशिकला माझी आणि राम यांची पहिली भेट घडवून आणली.

राम केळकरांची जीवनसंगिनी...

‘मला कधीही सोडून जायचं नाही’, या अटीवर राम यांनी माझ्यासोबत संसार थाटला. मीही त्यांना होकार दिला आणि त्यांना दिलेला शब्द पाळला. त्याकाळी त्यांचं खूप नाव होतं. हिंदीतील बडे निर्माते-दिग्दर्शक त्यांना परदेशी नेण्यासाठी येत, पण तेदेखील मुलं आणि मला सोडून जात नसत. आज मुलगी मनीषा अभिनेत्री म्हणून, तर मुलगा हेमंत लेखक-दिग्दर्शकाच्या रूपात आमचा वारसा चालवत आहेत.

५०० सिनेमांचा पल्ला...

‘वैशाख वणवा’, ‘अखेर जमलं’, ‘अवघाची संसार’, ‘काय हो चमत्कार’, ‘संगत जडली तुझी माझी’, ‘शेरास सव्वाशेर’ या मराठी सिनेमांसोबत ‘मि. एक्स इन बॅाम्बे’, ‘चायना टाऊन’, ‘उठेगी तुम्हारी नजर’, ‘थिफ आॅफ बगदाद’ या हिंदी आणि तमिळ भाषेतील सिनेमेही केले. ‘जानकी’ आणि ‘दृष्टी जगाची आहे निराळी’ या दोन सिनेमांची आम्ही निर्मितीही केली.

पुरस्कारांचा वर्षाव...

आजवरच्या करियरमध्ये बरेच पुरस्कार मिळाले. ‘वैशाख वणवा’, ‘हा माझा मार्ग एकला’ या सिनेमांसाठी, तसंच ‘पुत्र व्हावा ऐसा’ या सिनेमासाठी राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला. इसाक मुजावरांच्या ‘रसरंग’चे पुरस्कार मिळाले.

नृत्यातही सौंदर्य हवं...

डान्स कोणताही असो, तुमचे हावभाव अश्लील असता कामा नये. डान्स करणाऱ्यांच्या अदांमध्ये सौंदर्य असेल, तर ते पाहाणाऱ्यांच्या डोळ्यांमध्येही उतरतं. डान्सच्या नावावर व्यायाम नका करू. त्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पाहणाऱ्यालाही त्याचा आनंद उपभोगता येतो. गलिच्छपणा हा डान्सचा शत्रू आहे. त्यापासून दूर राहायला हवं.


हेही वाचा - 

चहा विकणारा बनला दिग्दर्शक

कॉम्रेड अजित अभ्यंकर रुपेरी पडद्यावर


पुढील बातमी
इतर बातम्या