महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना  जाहीर करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली. (veteran singer usha mangeshkar get lata mangeshkar award from maharashtra government)

५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप असून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सन २०२०-२१ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड एकमताने केली आहे.

उषा मंगेशकर यांनी आतापर्यंत मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. सुबह का तारा , जय संतोषी मां, आझाद, चित्रलेखा, खट्टा मीठा, काला पत्थर, नसीब, खुबसूरत, डिस्को डान्सर , इन्कार अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गायलेल्या लावण्यांमधील गावरान ठसका रसिकांना विशेष भावला. त्यांनी गायलेली असंख्य भावगीते, भक्तिगीते  अतिशय लोकप्रिय आहेत.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी उषाताईंचं पुरस्काराबद्दल अभिनंदन केलं आहे. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार शासनाने आपल्याला प्रदान करण्याचे घोषित केल्याबद्दल, उषाताई मंगेशकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

गायन व संगीत या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या कलाकारास राज्य शासनातर्फे सन १९९२ पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येतं. संगीतकार राम – लक्ष्मण, उषा खन्ना, उत्तम सिंग, प्रभाकर जोग, गायिका सुमन कल्याणपूर, आशा भोसले, पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले यांसारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.

हेही वाचा - मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचं मंगेशकर संगीत महाविद्यालय

पुढील बातमी
इतर बातम्या